मनाला आवरणं म्हणजे मनातला पसारा आवरणं आहे. मनाचं उतू जाणं थांबवणं आहे. मनात कसला पसारा आहे? तर मनात अपेक्षांचा, इच्छांचा आसक्तीयुक्त पसारा आहे. हा पसारा आवरणं म्हणजे मनाला आवरणं आहे. वासनातरंगांच्या ओढीनुसार घरंगळत जाणाऱ्या मनाला त्या घसरणीपासून थोपवणं म्हणजे मनाला आवरणं आहे. मन ओढींमागे खेचलं जाणारच, इच्छांमागे फरपटणारच, हे समर्थही गृहीत धरत आहेत आणि म्हणूनच तर मनाला आवरायला सांगत आहेत! तर हा स्वाध्याय आहे. समर्थ इथं मनाला उन्नत करायला सांगत नाहीत. ती खूप पुढची पायरी आहे. मनाचं तात्काळ अ-मन होऊ  शकत नाही. आधी मनाचं सु-मन व्हावं लागेल. बिघडलेलं मन आधी घडावं लागेल. मग एका परमतत्त्वाशी ते लय पावणं शक्य आहे.. आणि मागे सांगितलेलं पुन्हा सांगतो की, ही प्रक्रिया अध्यात्मापुरतीच नसते. श्रेष्ठ संशोधक असो, सूक्ष्म विचारांना ग्रहण करून ते मांडणारा तत्त्वज्ञ असो किंवा मोठा कलाकार, चित्रकार, स्वरोपासक असो! त्यांनाही आपल्या मनाची घडण बदलणारी तपश्चर्या प्रथम करावीच लागते. नाहक गोष्टींमागे, व्यर्थ विचारांमागे मनाचं वाहत आणि वाहवत जाणं थोपवावंच लागतं. मन एकाग्र करावं लागतं. मनाची व्यग्रता मोडून, बाकी सर्व विषयांच्या चिंतनातून मनाला सोडवून एका गोष्टीतच जेव्हा अंत:करण गोळा होतं तेव्हाच सर्वश्रेष्ठ कला, शोध, साहित्य किंवा संगीत जन्माला येतं! मी चिखलातच रुतून राहीन आणि त्याच वेळी आकाशात भराऱ्याही मारीन, हे शक्य नाही. मी स्थूलाच्या मोहातच अडकून राहीन आणि त्याच वेळी सूक्ष्म तत्त्वाचं आकलनही करून घेईन, हे शक्य नाही. अशाश्वत, नश्वराच्या आसक्तीत गुंतून राहीन आणि त्याच वेळी शाश्वत ईश्वराशीही एकरूप होईन, हे शक्य नाही. तेव्हा मनाला आवरण्याचा स्वाध्याय करावाच लागेल. बरं मनाला आवरणं सोपं नाही, हे समर्थही जाणतातच ना? म्हणूनच तर ‘करुणाष्टका’त ते म्हणतात की, ‘‘अचपळ मन माझे नावरे आवरिता!’’ माझं अचपळ मन आवरू म्हणता आवरलं जात नाही, ही या स्थानभ्रष्ट मनाची प्रारंभिक अवस्था आहे. हेच मन जेव्हा उन्नत होईल तेव्हाही ‘‘अचपळ मन माझे नावरे आवरिता,’’ हीच स्थिती साधेल बरं का! म्हणजे काय? तर आधी जगाच्या ओढीमागे धावण्यात चपळ असलेलं मन त्याबाबतीत अचपळ होईल आणि असं आवरलं गेलेलं हे मन अशाश्वत भ्रामक सुखाला वरणार नाही, स्वीकारणार नाही! मन आवरण्याच्या या मुद्दय़ावरून एका साधकानं विचारलं की, ‘‘जे. कृष्णमूर्ती यांच्यासारखे तत्त्वज्ञ मन आवरण्याऐवजी मनाच्या हालचालींकडे बारकाईनं पाहायला फक्त सांगतात. हे अधिक योग्य नाही का?’’ अनेकांच्या मनात अशा शंका येऊ  शकतात म्हणून याचा विचार करू. तर याचं उत्तर असं की, मनाला आवरत गेलो तरच त्याच्या हालचाली पाहाता येतील ना? मनाला आवरच जर घातला जात नसेल तर स्वत:कडे बारकाईनं पाहण्याचा विचार तरी मनाला शिवेल का? त्यामुळे मनाला आवर घालणं आणि मनाचं तटस्थ निरीक्षण करणं, या दोन्ही गोष्टी एकाच प्रक्रियेचा निर्देश करतात. जे मूल रडून ओरडून गोंधळ घालत आहे, ते त्याच अवस्थेत आपल्या स्थितीचं बारकाईनं निरीक्षण करू शकेल का? भ्रम आणि आसक्तीत अडकून आकांत करणाऱ्या माणसात आणि खेळण्यासाठी आकांत करीत हट्ट धरणाऱ्या लहान मुलात काय फरक आहे? दोघांची खेळणी वेगळी आहेत, पण खेळाची आसक्ती एकच आहे! तेव्हा आपल्या मनाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर आधी मनाला आवरावंच लागेल.. भले ते ‘नावरे आवरिता’ का वाटेना!