परळीच्या औष्णिक वीज केंद्रातील यंत्रणा परभणीत हलवून पंधरा दिवस लोटले

परभणी : जिल्ह्यतील प्राणवायूचा तुटवडा लक्षात घेता सक्षम पर्याय म्हणून परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील प्राणवायू यंत्रणा येथील जिल्हा परिषद इमारत परिसरात मोठी धावाधाव करत हलवण्यात आली. पंधरा दिवस लोटले तरी अद्यापही ती कार्यान्वित झाली नाही. या विलंबाचे कारण समजायला मार्ग नाही.

येथील प्राणवायूची मागणी वाढत असताना तातडीने उपाययोजना म्हणून परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील यंत्रणा दि. १८ एप्रिलला सायंकाळी येथील जिल्हा परिषदेच्या इमारत परिसरात वाहनाद्वारे आणण्यात आली.  परळीहून  दुपारी तीन वाजता ही सर्व यंत्रणा घेऊन वाहने परभणीच्या दिशेने रवाना झाली होती. तोवर या यंत्रणेच्या टाक्या बसवण्यासाठी आवश्यक ती जागा तयार करण्यात आली. त्याच दिवशी सायंकाळी ही वाहने येथे पोहोचली. ही यंत्रणा बसवण्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न चाललेले होते.

जेव्हा या कामास प्रारंभ झाला तेव्हा  सहा ते सात दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्या वेळी प्रशासकीय सूत्रांनी दिली होती. लोकप्रतिनिधींनी तर अवघ्या दोन ते तीन दिवसात ही यंत्रणा सुरू होईल असे दावे केले होते. या यंत्रणेचे काम उशिरात उशिरा जरी पूर्ण झाले तरी ते महाराष्ट्रदिनाच्या आधीच होईल आणि पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते औपचारिकरीत्या या यंत्रणेचे उद्घाटन केले जाईल असेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शहरातल्या सर्व कोविड केंद्रांना अपेक्षित प्राणवायू मिळणे अपेक्षित आहे. परळीहून परभणी येथे संबंधित यंत्रणा आणण्याकामी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी परिश्रम घेत मोलाची भूमिका बजावली, तथापि अद्यापही ही प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. प्रति तास पन्नास हजार लिटर प्राणवायूची क्षमता या यंत्रणेची असून १० ‘केएल’च्या दोन टाक्या आहेत. त्याद्वारे २४ तास प्राणवायू निर्मिती होणार असून सहाशे मोठे सिलेंडर रोज निर्माण होतील अशी या यंत्रणेची क्षमता आहे.

जिल्ह्यत प्राणवायूचा झालेला तुटवडा, अन्य जिल्ह्यंनी केलेली पळवापळवी या पाश्र्वभूमीवर चाकण, बेल्लारी, राजेश्वरी या तिन्ही ठिकाणांवरून प्राणवायूचे टँकर मागविण्याची कसरत जिल्हा प्रशासनाला  पार पाडावी लागली.  गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जिल्ह्यत प्राणवायूचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवत होता. अखेर एकाचवेळी चाकणवरून १८ ‘केएल’, बेल्लारीवरून १८ ‘केएल’ आणि राजेश्वरी (हैदराबाद) येथून १४ ‘केएल‘ असा प्राणवायू साठा उपलब्ध झाला.परभणी जिल्ह्यत प्राणवायूची अडचण असताना या जिल्ह्यसाठी आलेला प्राणवायू बीड  जिल्हा प्रशासनाने पळवला होता. या पाश्?र्वभूमीवर प्रशासनाला पुरेशी खबरदारी बाळगत सातत्याने पाठपुरावा करावा लागला होता. जिल्ह्यची दररोजची प्राणवायूची आवश्यकता १७ टन एवढी आहे. नव्याने झालेल्या जिल्हा परिषद इमारत परिसरात गेले काही दिवस काम सुरू होते. अजूनही ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी काही दिवस लागतील असे कळते. तातडीने ही यंत्रणा पूर्ण झाल्यास प्राणवायू बाबतची धावाधाव कमी होणार आहे.

महापालिकेची दुकानदारांवर कारवाई

टाळेबंदीच्या काळातही दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर  महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. एकूण १७ दुकानदारांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड तसेच विना मुखपट्टी फिरणाऱ्या २३ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ८९ हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला.