वर्तमानपत्रांच्या पहिल्या चार पानांवर बातमीऐवजी सर्वत्र पसरलेल्या जाहिराती आणि टीव्हीशिवाय इंटरनेट- मोबाइल सर्वत्र सुरू झालेली ऑनलाइन खरेदीसाठीची जाहिरातींची जांबोरी; येऊ घातलेल्या दिवाळीची वर्दी गेली दोन वर्षे देत आहे. वर्षांतून एकदा छानछोकीचे कपडेलत्ते घेण्याचा सण किंवा खास फराळाचा बेत असण्याचा काळ हा दिवाळीचा परिचयही केव्हाच मागे पडलाय. आता फराळाचे पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात आणि खास सवलतीच्या दरातील खरेदी सूटही अनेकदा वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने उपलब्ध असते; पण तरीही दिवाळी म्हणजे सर्वात मोठा सण हे समीकरण कायमच आहे आणि त्या सणाचा आनंदमेवा देण्यासाठी कंपन्याही सज्ज आहेत.

जागतिकीकरणानंतरच्या गेल्या २० वर्षांत बदलत गेलेली दिवाळीची खरेदी एवढा विषय घेतला तरी आपल्याला अर्थव्यवस्थेचे बदलत गेलेले रूप आणि वाढलेले नागरीकरण यांची नेमकी कल्पना येऊ शकेल. वाढत चाललेला मध्यमवर्ग- उच्च मध्यमवर्ग आणि त्यांची क्रयशक्ती जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरू झालेल्या वाटचालीची नेमकी प्रचीती देते.

एकत्र कुटुंबपद्धतीची भुरळ अद्याप टीव्हीवरच्या मालिकांमध्ये असली तरी विभक्त कुटुंब पद्धती हे वास्तव आहे. त्यातही विभक्त कुटुंबाचा खर्च किमान ३० टक्क्य़ांनी वाढतो हे अर्थशास्त्रीय वास्तव झाले. या साऱ्याकडे बाजारपेठेशी संबंधित मंडळी वाढत चाललेला ग्राहकवर्ग म्हणून पाहतात. यात गेल्या अनेक वर्षांत झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे मोबाइल आणि इंटरनेट. रोटी, कपडा, मकान आणि मोबाइल ही आजची गरज आहे. मोबाइलवरच पाहून एखादी वस्तू खरेदी करणे ही १० वर्षांपूर्वीही परिकल्पनाच वाटायची. साडीला हात लावून, त्याचा पोत पाहून मगच खरेदी या भारतात होणार असे छातीठोकपणे सांगितले जायचे, तिथे आता एका दिवसात ऑनलाइन कंपन्या प्रत्येकी काहीशे कोटींची विक्री सर्रास करताहेत आणि ग्राहकही विनाशंका, निर्धास्त खरेदी करताहेत. मानसिकता आणि अर्थव्यवस्था या दोन्हींतील हा बदल खूप महत्त्वाचा आहे.

अर्थात आता ऑनलाइन खरेदीत अन्नपदार्थाचा समावेशही तेवढाच मोठा आहे. आनंदाचा मार्गच पोटातून जातो. आनंदाची व्याप्ती खाण्यानेच पूर्ण होते. म्हणून यंदा दिवाळीपूर्व रुचकर व शॉपिंग विशेषांकात आम्ही या दोन्हींवर भर दिला आहे.

हॅप्पी शॉपिंग
दिवाळीचा ठेवा
आनंदाचा मेवा !
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com