28 September 2020

News Flash

झोप उडाली!

आजवरच्या अभ्यासामध्ये तीन महत्त्वाची कारणे झोप उडण्याच्या बाबतीत लक्षात आली आहेत.

विनायक परब –  @vinayakparab , vinayak.parab@expressindia.com

हॅल्लो, असे म्हणत त्या विदेशी व्यक्तीने आनंदसोबत संवाद साधण्यास सुरुवात केली आणि कुंडलीच जणू काही उलगडत जावी त्याप्रमाणे त्याने आनंदच्या चेहऱ्याकडे पाहत त्याची दिनचर्या सांगायला सुरुवात केली. घरी येणारे कुडमुडे ज्योतिषी ज्या पद्धतीने भविष्य सांगतात, त्याचीही आठवण आनंदला झाली. मात्र त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीमध्ये एक वैज्ञानिक टोक होतं, हे विज्ञानवादी असलेल्या आनंदला एव्हाना पुरतं लक्षात आलं होतं. आनंद एका कंपनीचा मुख्य व्यवस्थापक होता. सकाळी सव्वासहाला बरोबर त्याच्या दिनक्रमाची सुरुवात व्हायची. रात्री अडीच वाजता पुस्तक हातातून खाली ठेवले की मग त्याचा दिवस संपायचा. त्याच्याइतके काम करणारे कार्यालयात तसे अभावानेच होते. त्याच्या या व्यग्र दिनक्रमाचा आढावाच त्या विदेशी व्यक्तीने त्याच्यासमोर मांडला आणि विचारले, उत्तरे बरोबर आहेत का? आनंदसाठी तो धक्काच होता. त्याने चौकशी केली त्या वेळेस लक्षात आले की, ती जर्मन व्यक्ती ही जादूगार किंवा ज्योतिषी नव्हती, तर तो निद्राविकारतज्ज्ञ असलेला नामांकित संशोधक होता. हाताची ठेवण, हातापायाची रचना, उभे राहण्याची पद्धती आणि त्वचेची प्रत यावरून त्या तज्ज्ञाने आनंदची झोपेची प्रत ओळखून त्याच्या जगण्याचे गणित मांडले होते. त्यामागे कोणतीही जादू किंवा ज्योतिष नसून केवळ आणि केवळ विज्ञानच होते. अधिक काळ जगायचे आणि अधिक अभ्यास करून आयुष्य समृद्ध करायचे तर उत्तम आयुष्यासाठी झोपेला पर्याय नाही हे त्याने आनंदला पटवून दिले.

आनंदसारखीच काहीशी अवस्था नरेनचीही होती. तोही एका बडय़ा कंपनीचा सीईओ होता. रात्री कितीही वाजता झोपी गेला तरी अगदी सहा वाजता नियमितपणे जिममध्ये पोहोचणारा आणि नियमित व्यायाम करणारा. मात्र दुर्दैव म्हणजे जिममध्ये व्यायाम करतानाच त्याचा मृत्यू झाला. अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले की, नियमित व्यायाम करणाऱ्याचा मृत्यू का व्हावा? व्यायाम नसलेल्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो, असे म्हणतात. मग नरेनचे असे का झाले? नरेनच्या प्रकरणाची चर्चाही मीडियामधून बरीच झाली. अंतिमत: झोप आणि व्यायाम या संदर्भाचा वैज्ञानिक पद्धतीने विचार करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितलेला निष्कर्ष हा कमी आणि अपुऱ्या झोपेकडे निर्देश करणारा होता.

तिसऱ्या एका प्रकरणात शहरातील हृदयविकारतज्ज्ञांची एक परिषद सुरू होती. हृदयविकारामागच्या कारणांची चर्चा सुरू होती. त्यात देशात सर्वाधिक ओपन हार्ट सर्जरी करणारे तज्ज्ञ बोलत असताना बाजूलाच असलेले निद्राविकारतज्ज्ञ म्हणाले की, त्यांच्या डोळ्यांखालची लोंबणारी त्वचा असे सांगते आहे की, त्यांनाच झोपेची अतिशय गरज आहे. त्यांचे शरीरदेखील अपवाद नव्हे. दुर्दैवाने त्या हृदयविकारतज्ज्ञांनाच या घटनेच्या पाच दिवसांनंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यास सामोरे जावे लागले. या तिन्ही घटना वास्तवात घडलेल्या आहेत. मात्र त्यातील नावे बदलण्यात आली आहेत. तिन्ही घटनांमध्ये एकच महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे अपुरी किंवा पुरेशी नसलेली झोप.

जागतिक आरोग्य संघटना प्रतिवर्षी जगभरातील आरोग्याचा एक अहवाल प्रकाशित करते. सुमारे २० वर्षांपूर्वी सर्वप्रथम त्या संदर्भात एक महत्त्वाची नोंद अहवालात करण्यात आली, तिचा विषय होता झोप. त्यानंतर आतापर्यंत अनेकदा या जागतिक संघटनेने त्या संदर्भातील संशोधन हाती घेऊन जगभरातील अनेकांची झोप सातत्याने उडत असल्याचे अहवाल प्रकाशित केले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरामध्ये आधुनिकवादी जीवनशैलीमध्ये आपण सर्वानीच झोपेला क्षुल्लक ठरविल्याचे किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे शास्त्रीय अहवालांमधून उघडकीस आले आहे. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेचाच अहवाल असेही सांगतो की, अनेक विकार बळावण्यामागेही अपुरी झोप, त्यामुळे खालावलेली शरीराची प्रतिकारक्षमता ही दोन सर्वात महत्त्वाची कारणे आहेत. परिणामी आपण झोप कमी घेतो त्या वेळेस त्याचा अंतिमत: फटका हा अर्थव्यवस्थेलाही बसतो. आजारपणात व्यक्ती काम करू शकत नाही, हा अर्थव्यवस्थेसाठी फटकाच असतो.

आजवरच्या अभ्यासामध्ये तीन महत्त्वाची कारणे झोप उडण्याच्या बाबतीत लक्षात आली आहेत. ही सर्वच्या सर्व कारणे ही आधुनिक जीवनशैली आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत. झोप उडाली आहे ती प्रामुख्याने नगरे आणि महानगरांमध्ये राहणाऱ्यांची. कामाचा अतिताण हे त्याचे एक सर्वात महत्त्वाचे कारण. अत्याधुनिक जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याचे व पर्यायाने झोपण्याचेही बिघडलेले गणित हे दुसरे कारण आणि तिसऱ्या महत्त्वाच्या कारणामध्ये सूर्यास्त आणि सूर्योदयही पाहू न शकणे हे महत्त्वाचे कारण सांगण्यात आले आहे. यातील तिसरे कारण हे प्रसंगी गमतीशीर आणि अविश्वसनीय असे वाटू शकते. मात्र शहरातील मंडळींच्या अभ्यासामध्ये त्यांनी अनेक महिन्यांमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहिलेला नाही, ही धक्कादायक गोष्ट वैज्ञानिकांना लक्षात आली. याचा संबंध नंतर दोन महत्त्वाच्या गोष्टींशी आढळून आला तो म्हणजे ऊन आणि माती. त्यामुळे शहरीकरणाच्या प्रक्रियेत या दोन महत्त्वाच्या असलेल्या घटकांचा संपर्क मानवी शरीराशी राहिलेला नव्हता अशा निद्राविकारग्रस्तांना मातीमध्ये चालणे आणि उन्हामध्ये गॉगल न घालता काही काळ तरी वावरणे असे उपचार सांगण्यात आले, त्याचा आधिक्याने फायदा झाला.

शहरातील मंडळींचे स्वत:च्या शरीराकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाणही अधिक आहे. शिवाय एक महत्त्वाचा भ्रम शहरवासीयांनी जोपासलेला दिसतो, तो म्हणजे व्यायाम. नियमित व्यायाम असेल तर झोप कमी घेतली तरी चालते हा निव्वळ भ्रमच असल्याचे फिटनेसच्या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. किंबहुना नियमित व्यायाम करणाऱ्या सीईओ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अलीकडे झालेल्या मृत्यूमागे अनियमित झोप हे महत्त्वाचे कारण होते. त्यामुळेच तर शैलेश परुळेकर यांच्यासारखे तज्ज्ञ जिममध्ये येणाऱ्याला प्रथम झोप व्यवस्थित झाली आहे का ते विचारतात. अपुरी झोप असल्याचे लक्षात आलेच तर जिमच्या दारातूनही परत पाठविण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मात्र आपण आयुष्यात इतर सर्व बाबींना अति आणि झोपेला सर्वात कमी महत्त्व असे समीकरण करून ठेवले आहे. भारतीयांच्या आरोग्यविषयक सवयी आणि त्यांना होणारे विकार या संदर्भात दोन वर्षांपूर्वी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेही एक महत्त्वाचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जारी केला होता. मधुमेह आणि रक्तदाब व पर्यायाने येणारा हृदयविकार या तिन्ही महत्त्वाच्या विकारांमागे कमी झोप हेच सर्वात महत्त्वाचे कारण असल्याचेही त्याही वेळेस लक्षात आले होते. तरीही आपण आपल्या सवयींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. औषधपाण्यावर आणि त्यांच्याशी संबंधित योजनांवर पाण्याप्रमाणे पैसा खर्च करण्याऐवजी खरे तर शाळांमध्ये अगदी बालवयापासून झोपेसारख्या क्षुल्लक वाटणाऱ्या, मात्र आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींविषयी जाणीवजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी माणसाने व्यायाम नाही केला तरीही चालू शकेल, पण आहार, विहार आणि निद्रा या तीन बाबी काटेकोरपणे पाळायलाच हव्यात, असे सर्वच तज्ज्ञ डॉक्टर्स नेहमी सांगतात.

‘लोकप्रभा’तील आरोग्यविषयक सदराचे नियमित लेखक देशातील प्रख्यात वैद्य कै. प. य. वैद्य खडिवाले ऊर्फ दादा नेहमी म्हणायचे की, सकाळचे व रात्रीचे चालणे या दोन गोष्टीही माणसाला अनेक विकारांपासून सहज दूर ठेवतात. सकाळचे चालणे हे ऊर्जा बल देणारे असते. ते आरोग्यदायी या प्रकारात मोडते, तर रात्रीचे चालणे हे प्रतिबंधात्मक असते, म्हणजेच तुम्हाला अनेक विकारांपासून दूर ठेवण्याचे काम करते. महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या शतपावलीने झोपही चांगली लागते. झोप शांत झालेली असेल तर माणूस कामही व्यवस्थित आणि न थकता करू शकतो.

या विषयाचे महत्त्व लक्षात आल्यामुळेच ‘लोकप्रभा’ने त्याकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी ‘झोप विशेषांक’ करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विविध निद्राविकारतज्ज्ञांनी हा विषय सविस्तरपणे हाताळला आहे. अनेक वर्षे आपल्याकडे मानसोपचार नाकारण्याचेच काम आपण केले. मनोविकारांना उपचारांची गरजच आपण नाकारली. सध्या झोपेच्या बाबतीतही तेच होते आहे. झोप उडाली तर त्यावर उपचार वेळीच करून घेणे हे आपल्या आणि राष्ट्राच्या दोघांच्याही हिताचे आहे, हेही तेवढेच महत्त्वाचे. एकाचीच झोप उडाली तर फार लक्ष देण्यासारखे काही नाही, असे म्हटल्यामुळेच आता झोप उडणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, ती निश्चितच परवडणारी नाही. त्यामुळे देशहिताचाही विचार करायचा तर निद्रादेवीने प्रसन्न होणे हेदेखील सक्षम अर्थव्यवस्थेसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 1:01 am

Web Title: lokprabha editorial on sleep disorders
Next Stories
1 ‘मेक इन इंडिया’चा फुगा
2 माणूसपणाची व्होट बँक नाही
3 स्वानंदगणेश!
Just Now!
X