विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com

दोघांचीही भेट चेरापुंजीला झाली त्या वेळेस त्या योगायोगावर दोघांचाही विश्वासच नव्हता. ती कॉर्पोरेट कंपनीतील वरिष्ठ अधिकारी लाखो कमावणारी आणि तो कुरिअर कंपनीतला वरिष्ठ कारकून. समान दुवा एकच. दोघांनाही निसर्गाची आणि पर्यटनाची आवड. दोघेही निसर्गाला कडकडून भेटण्यासाठी आसुसलेले. दोघांनाही मनाली नको होतं कारण आताशा बेबंद वाढलेल्या पर्यटनामुळे तिथला बर्फही काळा झालेला. शुभ्र बर्फ पाहायची आणि निसर्गाला उराउरी भेटायची ओढ होती.. पण ही आवडच दोघांनीही गेल्या अनेक वर्षांत मारलेली. रुपालीच्या मागे घरातले लागलेले लग्नासाठी. तिला मुळात प्रश्न पडलेला, लग्नच कशासाठी? तर अनिकेतला वाटत होतं आपण केवळ आयुष्याच्या रामरगाडय़ातच अडकलोय. मनात जे आहे मनसोक्त करायचंय, आयुष्यही मनसोक्त जगायचंय ते कधी करणार. आताच आयुष्याची पन्नाशी जवळ आलेली. अखेरीस आपापल्या नोकरीचे राजीनामे देऊन घरच्यांचं न ऐकता दोघेही मार्ग धुंडाळण्यासाठी बाहेर पडलेले. चेरापुंजीला मराठी आवाज ऐकला म्हणून एकमेकांची वास्तपुस्त करते झाले. मग चर्चा रंगल्या.

अनिकेत कुरिअर कंपनीत असला तरी फिरलेला बराच होता. विदेशात जेव्हा भारतीय पर्यटकांसाठी सूचना, असे सांगून ‘कचरा करू नका, तो खिडकीतून बाहेर फेकू नका,’ असे सांगतात तेव्हा त्यालाही आपल्यासारखीच भारतीय असल्याची पहिल्यांदा लाज वाटली हे रुपालीला जाणवलं होतं. मग तिला हाँगकाँग कसं आणि बहुवर्णीयांना सामावणारं असल्याने तिला आवडलं ते तिनेही त्याच्याशी शेअर केलं. भारतीयांचा थिल्लरपणा तर तिच्या डोक्यातच गेला होता. मग अनिकेतनेही सांगितलं की, भूतानला हॉटेल रिकामं असतानाही दिल्ली आणि बंगालमधून आलेले पर्यटक खोल्या घाण करतात म्हणून, ‘खाली नहीं है,’ असं सांगून त्यांना कसं पळवलं जातं. दोघांमध्येही एकवाक्यता होती ती यावर की, भारत तो भारतच. पण इथल्या मंडळींना शिस्त लागायला हवी आणि त्यांच्या दृष्टीबरोबरच वृत्तीतही फरक यायला हवा. अनिकेतच्या डोक्यात एका अशा पर्यटक कंपनीची कल्पना होती की जी स्टार्टपअ असेल आणि ती जगभ्रमंतीबरोबरच खास करून भारतीय पर्यटकांना शिस्तीचे धडे देतानाच. फिरायचं कशासाठी याचाही साक्षात्कार घडवेल. दोघांनाही वाटत होतं एकांडय़ाच्या भटकंतीसाठी समन्वयक होता यायला हवं.

एकांडी भटकंती खूप काही देऊन जाते, यावरही एकमत झालं. माणूस जबाबदारी घ्यायला शिकतो, त्याच्या क्षमता, धैर्य- प्रसंगावधानासारखे गुण, आत्मविश्वास साऱ्याचीच पडताळणी होते. मित्र मिळतात, नवे संबंध जुळतात ते तर होतंच पण बोनस असतो तो आत्मिक आनंद. अनिकेत म्हणाला, त्याला गंमत वाटत होती; त्या आयत्या वेळेस येणाऱ्या समस्यांची आणि त्यावर मात करण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच वापरलेल्या भन्नाट मार्गाची!

तर रुपालीने शेअर केलं ते म्हणजे भाषा भिन्न असतानाही केवळ गाणी, नृत्य यामधून माणसं जोडली जाणं. केवळ त्यातूनही माणसं जोडली जातात. ती भाषा जागतिक आहे.

मग परत एकदा पर्यटनाच्या स्टार्टअपवर चर्चा झाली. पहाटेचे तीन वाजले होते, आत्मिक आनंद देणाऱ्या या विषयातच पुढचं करिअर करायचंही ठरलं आणि मग त्याचं नावही ठरलं ..दिल चाहता है!