विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
‘‘संघ जिंकतो त्या वेळेस मी जर्मन असतो आणि हरतो त्या वेळेस मात्र मी स्थलांतरित असतो’’ हे विख्यात जर्मन फुटबॉलपटू मेसूद ओझिलचे उद्गार प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमीसाठी आणि क्रीडापटूसाठी अक्षरश: काळीज चिरणारेच होते. कारण या उद्गारानंतर त्याने जर्मनीच्या फुटबॉल संघाची जर्सी उतरवली. वंशविद्वेष हे त्यामागचे महत्त्वाचे कारण होते.  वंशविद्वेषाच्या कारणावरून संघातून निवृत्ती स्वीकारणे तेही जर्मनीसारख्या संघातून हे केवळ जर्मनीसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी चिंताजनक आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा प्रसंग फुटबॉल आणि जर्मनीपुरताच मर्यादित नाही तर यामध्ये जगात सध्या वाढत असलेल्या स्थानिक राष्ट्रवादी अतिरेकाची बीजे आहेत, जी कदाचित भावी काळात जगाला वेगळ्याच दहशतीच्या टोकावर नेऊन ठेवतील. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी निमित्त ठरली ती गेल्या मे महिन्यामध्ये त्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगान यांच्या भेटीच्या वेळेसचे छायाचित्र त्याने प्रसिद्ध केले होते. हा सारा वंशवाद उफाळून येण्यास कारणीभूत ठरला तो जर्मनीचा विश्वचषक फुटबॉलमध्ये अलीकडे झालेला पराभव. या पराभवानंतर ओझिलवर टीका करताना जर्मनीतील वंशविद्वेषी मंडळींचा तोल ढळला आणि खेळाचाच पराभव झाला.

यापूर्वी जर्मनीला विश्वचषक मिळवून देण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता, त्याचाही टीकाकारांना विसर पडला. २००९ ते २०१८ या कारकीर्दीत त्याने ९२ सामन्यांमध्ये एकूण २३ गोल केले. तो वंशाने तुर्की असून धर्माने मुस्लीम आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीच्या उभारणीसाठी तुर्कस्तानातून अनेकांना ‘पाहुणे कामगार’ म्हणून जर्मनीमध्ये आणण्यात आले. काही जण स्वतहून स्थलांतरित झाले. आजच्या जर्मनीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दोन पिढय़ांना जर्मनीने नागरिकत्व नाकारले. मात्र १९९५ साली झालेल्या बदलानंतर त्यांना दुहेरी नागरिकत्व देण्यात आले. त्या वेळेस ओझिल सात वर्षांचा होता. त्याची पिढी ही जर्मन नागरिकत्व मिळालेली पहिलीच पिढी होती. ओझिलने त्याची सारी निष्ठा ही केवळ आणि केवळ जर्मनीसाठीच वाहिलेली होती. यापूर्वीचा फिफा विश्वचषक जर्मनीला मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जर्मनीमध्ये नवनाझीवाद बोकाळला असून स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या चळवळी वाढल्या आहेत. स्थलांतरितांना हाकलून देण्याची मागणी सातत्याने होते आहे. त्याचाच परिपाक जर्मनीच्या पराभवाच्या वेळेस ओझिलवर झालेल्या आरोपांमध्ये जगाला पाहायला मिळाला. मे महिन्यात त्याने तुर्कस्तानच्या अध्यक्षांच्या भेटीच्या वेळेस फोटोसह केलेल्या पोस्टचे निमित्त परत उकरून काढण्यात आले आणि त्याला विश्वचषकातील पराभवासाठीचा बळीचा बकरा करण्यास सुरुवात झाली. जर्मन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष रेनहार्ड िगड्रेल हे देखील त्या धुळवडीत उतरले, तिथे त्याचा कडेलोट झाला. त्या छायाचित्राच्या निमित्ताने त्यांनी ओझिलच्या निष्ठेवरच प्रश्न केला आणि मग वंशविद्वेष थेटच दिसू लागला. अखेरीस सोशल मीडियावर ‘#आतावंशविद्वेषथांबवा’ या मथळ्याखाली ओझिलने आपला संघनिवृत्तीचा निर्णय जाहीर केला. जर्मनीच्या संघामध्ये पोलंडचेही काही स्थलांतरित आहेत, मात्र त्यांच्याबद्दल असा प्रश्न उपस्थित केला जात नाही आणि माझ्याबाबतीत मात्र निष्ठेवर प्रश्न केला जातो, कारण मी तुर्की आहे आणि मुस्लीमही, हे ओझिलचे उद्गार खरे तर जगाने वंशविद्वेषाचा विचार वेळीच करायला हवा, याचा साक्षात्कार करून देणारे आहेत.

पण हे काही फक्त जर्मनीमध्येच दिसणारे चित्र नाही तर जगभर सध्या स्थलांतरिताच्या विरोधात वातावरण तापवले जात आहे.  स्थानिक राजकारणाचा तो महत्त्वाचा भाग असून सर्वत्रच असे विषण्ण करणारे वातावरण आहे. खरे तर अमेरिका नावाचा देश हा तर जगभरातून आलेल्या स्थलांतरितांनीच आपापल्या कार्यकर्तृत्वाने उभा केलेला आजवरचा आदर्श असा देश होता. त्या भूमीवर इतर कशाला नव्हे तर केवळ गुणवत्तेलाच वाव आहे, असे म्हणून तिथे पाहिले जात होते. जगभरच्या लोकांना अमेरिकेत जाण्याची व स्वप्रगतीची आस होती. मात्र तिथेही आता संकुचित विचारसरणी आणि स्थलांतरितांना विरोध करण्याची मानसिकता वाढते आहे. स्थलांतरितांना रोखण्यासाठी तर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुंपणिभत बांधण्याची अनोखी योजनाही जाहीर केली होती. जगभरातील विचारवंतांनी त्यावर जोरदार टीका केली.

फार कशाला तर भारतातही सर्वत्र हा वाद नेहमीच उफाळताना दिसतो. मुंबईच्या बकाल अवस्थेस ज्याप्रमाणे देशभरातून होणारे स्थलांतरण जबाबदार आहे, असे मानले जाते तसेच मुंबईच्या समृद्धीसही तेच जबाबदार आहे, याचा आपल्याला विसर पडतो. आठ बाय दहामध्ये राहणारा आणि तिथेच संसार थाटणारा, इस्त्रीच्या फळकुटाखालीच रात्री जेवण करणारा ‘तो’ उत्तरप्रदेशी महाचिवट असतो. कुठेही जाऊन, कसेही राहणारा, कोणतेही काम करण्याची तयारी असलेला तोच अखेरीस डार्वनिच्या सिद्धान्तानुसार ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’मध्ये अगदी फिट्ट बसतो आणि मराठी माणूस मागे पडतो. कारण तो केवळ नाक्यावरच्या चर्चामध्ये रमतो आणि चांगल्या कामासाठी नेहमीच वाट पाहात राहतो. मराठी माणसे बाहेरगावी गेली आणि यशस्वी झाली आहेत अशी उदाहरणे आहेतही, पण इतरांच्या तुलनेने ती फारच कमी आहेत. तामिळनाडू, केरळ, बिहारमध्ये जाऊन काही वेगळे करण्याचा विचार आपण सहसा करीत नाही. स्थलांतरितांविरोधात बोंब ठोकताना याचाही विचार व्हायला हवा.

शिवाय गंमत म्हणून किंवा सहज म्हणून कधी कुणी स्थलांतरण करीत नाही तर अनेकदा ते गरजेपोटी किंवा आपल्या आकांक्षांना खतपाणी घालण्यापोटी, स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी होत असते. अनेक मराठी मुले आज कॅलिफोíनयामध्ये सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आहेत, त्यामागे त्यांच्या मोठे होण्याच्या इच्छा-आकांक्षा आहेत. मात्र अमेरिकन प्रांतवादाचा अडसर आता त्यांना जाणवू लागला आहे.

खरे तर युरोपातील अनेक देश आणि अमेरिकेची उभारणीच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर झाली. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये असणाऱ्या वातावरणाच्या तुलनेत तिथे बरीचशी उदारमतवादी धोरणे होती. त्या देशांनी केलेल्या प्रगतीच्या मुळाशीही ही उदारमतवादी धोरणेच आहेत. मात्र त्या उदारमतवादाला आता वंशवादाची आणि स्थानिक राष्ट्रवादाची वाळवी लागली आहे. स्थानिक वादाला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह असे नवे सूत्र तयार झाले आहे. त्याची लागण जगभरात अतिशय वेगाने होत असून जागतिक सौख्याला लागलेले ते गालबोटच आहे.

या बोकाळत चालेल्या अतिरेकी राष्ट्रवादाच्या संदर्भात विचार करताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की आजवरचा जगाचा इतिहास किंवा मानवी इतिहास हा स्थलांतरणाचाच तर इतिहास आहे. माणसाने स्थलांतरण केलेच नसते तर हा इतिहासच निर्माण झाला नसता. आफ्रिकेमध्ये  आदिमानवाचा जन्म झाला आणि स्थलांतरणादरम्यान अनेक बाबींना तो वेळोवेळी सामोरा गेला. कधी त्याला अतिशीत तर कधी अतिउष्ण अशा वातावरणाला सामोरे जावे लागले तर कधी तो इतर प्राण्यांच्या तुलनेत सुरू असलेल्या त्याच्या प्रवासात विविध गोष्टी शिकत गेला, त्याचे शरीर आणि मेंदू त्याच्या विकासाला कारणीभूत ठरले आणि उत्क्रांती झाली. संशोधकांनी या उत्क्रांतीचा शोध घेतला त्या वेळेस त्यामागे असलेल्या अनेक कारणांमागे स्थलांतरण व त्या दरम्यान सामोऱ्या जाव्या लागलेल्या समस्या हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आजवरच्या माणसाच्या इतिहासात हे स्थलांतरण समांतरपणे सुरूच आहे. त्याची प्रगती आणि त्याची उत्क्रांती या दोन्ही मागे ते महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे स्थलांतरणावरून रान पेटवण्यापूर्वी इतिहासातून आपण धडे घेणे आवश्यक आहे. अन्यथा कागदी इतिहासाला काही अर्थ नाही.

स्थलांतरणामुळे जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी समस्यांमध्ये वाढ होते आहे हेही खरेच आहे. मात्र म्हणून स्थलांतरणाला वंशविद्वेष किंवा धार्मिक कारणाने विरोध करणे हे चुकीचे आहे. टोकाची भूमिका कधीच परवडणारी नाही. त्यामुळे स्थलांतरण हा मानवी इतिहास आणि प्रगतीसाठी पूरक मुद्दा आहे, हे लक्षात ठेवून या विषयाशी संबंधित समस्यांमध्ये सुवर्णमध्य असलेला मार्ग काढायला हवा. नाही तर सध्या आपण धार्मिक दहशतवादाचे बळी तर ठरलेले आहोतच. पण या मुद्दय़ाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आणखी एका वेगळ्या दहशतवादाच्या सीमेवर अख्खी मानवजातच उभी ठाकेल. म्हणूनच ओझिल प्रकरणाकडे इशाऱ्याची चिंताजनक घंटा म्हणूनच पाहायला हवे!