मध्य रेल्वेने दिवावासियांना खुशखबर दिली आहे. दिवा रेल्वे स्थानकावर आता १० जलद लोकल थांबणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे दिवावासियांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या स्थानकावर जलद लोकलला थांबा नव्हता. या निर्णयामुळे दिवावासियांची सोय होणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात जलदगती लोकल थांबतील. जलदगती लोकलला थांबा मिळावा यासाठी दिवावासियांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
दिवा स्थानकात सध्या दोन नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नोव्हेंबरपासून कल्याण आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकादरम्यान धावणाऱ्या जलद लोकल दिवा स्थानकावर थांबतील. येथील लोकलची संख्या व प्रवाशांची वाढती संख्या यामुळे धीम्या गतीच्या लोकलवर मोठा ताण यायचा. प्रवाशांची मोठी गैरसोय व्हायची. यासाठी काही दिवसांपूर्वी प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको आंदोलनही केले होते. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत आश्वासन दिले होते. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे धीम्या गतीच्या लोकलवरील ताण कमी होईल. सध्या दररोज ८४ जलदगती लोकल या स्थानकावरून धावतात. त्यापैकी १० जलदगती लोकलला येथे थांबा मिळेल.