विद्यार्थ्यांना विषय समजावा म्हणून कधी पाऊण तर कधी एक तासाची ‘तासिका’ घेणाऱ्या प्राध्यापकांची मुलाखत अवघ्या मिनिटभरात उरकण्याचा ‘मॅराथॉन’ विक्रम मुंबई विद्यापीठाने केला आहे. मराठी भाषा विभागातील सहाय्यक प्राध्यापकांच्या दोन रिक्त पदांकरिता अवघ्या तीन तासांत १०० उमेदवारांच्या मुलाखती उरकण्याचा अनोखा विक्रम विद्यापीठाच्या नावे जमा झाला आहे!
प्राध्यापक, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापक अशी प्रत्येकी दोन पदे याप्रमाणे सहा पदे भरण्यासाठी विद्यापीठातर्फे शनिवारी, २७ एप्रिल रोजी उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी राज्यभरातून १३९ उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. दुपारी १२च्या सुमारास मुलाखतींचे सत्र सुरू झाले. पहिल्या तीन तासांत प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकपदासाठी ३० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर सव्वा तीनच्या सुमारास सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या. त्या सव्वा सहापर्यंत चालल्या. या तीन तासांत सर्वच्या सर्व म्हणजे १०० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. म्हणजे एका उमेदवाराची मुलाखत सरासरी दोन मिनिटेही चालली नाही, असा याचा अर्थ होतो. त्यामुळे, ही संपूर्ण निवड प्रक्रियाच फार्स असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे. एखाद्या उमेदवाराची पारख करण्यासाठी प्रत्येकाला किमान पाच मिनिटांचा वेळ देणे तरी गरजेचे असते. मात्र, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी इच्छुक उमेदवारांपैकी कोणाचीही मुलाखत एवढय़ा वेळ चालली नसल्याचा दावा एका उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर केला.
भलतेच प्रश्न
मुलाखतीत विचारण्यात जाणाऱ्या प्रश्नांमध्येही खोली नव्हती असाही आरोप होत आहे. उमेदवाराला त्याच्या विषयातले किती कळते याविषयीचे प्रश्न मुलाखतकर्त्यांकडून येणे अपेक्षित असताना उमेदवाराला त्याचे नाव-गाव, शिक्षण कुठून झाले, पीएचडी का केली नाही, लेख का लिहिले नाहीत, पुस्तक छापले असेल तर ते कुणी वाचते तरी का, अशा प्रकारचे अत्यंत वरवरचे आणि प्रसंगी उद्धट वाटतील असे प्रश्न विचारले जात होते.
विद्यापीठ म्हणते..
निवड समितीतील एक सदस्य आणि विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता पी. जी. जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यापीठाची बाजू मांडताना उमेदवारांकडून केले जाणारे आरोप फेटाळून लावले. ‘केवळ नेट-सेटच नव्हे तर पुरेसे संशोधन, अध्ययनाचा अनुभव, आणि नेतृत्त्वगुण हे गुण ज्या उमेदवारांमध्ये आम्हाला दिसले त्यांची मुलाखत अधिक काळ चालली. याचा अर्थ निवड प्रक्रियाच सदोष होती किंवा तो नुसताच देखावा होता असे नाही,’ असा खुलासा त्यांनी केला.