राज्यात १०,३०९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ३३४ जणांचा दिवसभरात मृत्यू झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या तुलनेत कमी झाली असली तरी नाशिक शहरात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत पुणे १२८२, पिंपरी-चिंचवड ७४०, नाशिक ५३५, जळगाव ३२३, नगर जिल्हा ४२४, नगर शहर २५० रुग्ण आढळले आहेत.  राज्यातील रुग्णांची संख्या ४ लाख ६८ हजार झाली असून,  १६,४७६ जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत ४२ जणांचा मृत्यू

मुंबईत बुधवारी एक हजार १२५ करोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या एक लाख १९ हजार २५५ इतकी झाली आहे. दिवसभरात ४२ जणांचा मृत्यू झाला.

मुंबईमधील विविध रुग्णालयांमध्ये बुधवारी ६७१ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. बुधवारी ७११ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत मुंबईतील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ९१ हजार ६७३ वर पोहोचली आहे, तर सहा हजार ५८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला मुंबईमध्ये विविध रुग्णालयांमध्ये २० हजार ६९७ उपचाराधीन रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १२८७ नवे रुग्ण

* ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी १ हजार २८७ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ३८९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या २ हजार ५५७ इतकी झाली आहे.

* जिल्ह्य़ात बुधवारी आढळलेल्या ्नरुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली ३३७, नवी मुंबईत २७८, ठाणे शहर २७०, मीरा-भाईंदरमधील १३२, ठाणे ग्रामीण  ९२, अंबरनाथमधील ८०, बदलापुरातील ४९, उल्हासनगर ३१ आणि भिवंडीतील १८ जणांचा समावेश आहे.

* बुधवारी  जिल्ह्य़ात ४१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ९, ठाण्यातील ८, ठाणे ग्रामीणमधील ४, नवी मुंबईतील ४, मीरा भाईंदरमधील ३, भिवंडीतील ३, बदलापूरमधील ३, तर उल्हासनगर आणि अंबरनाथमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईतील आकडेवारी

* करोनामुक्त रुग्णांचा दर – ७७ टक्के

* करोना वाढीचा दर – ०.८७ टक्के

* रुग्ण दुपटीचा दर – ८० दिवस

* चाचण्या – ५,६७,०३१

* प्रतिबंधित क्षेत्र – ६२१

* टाळेबंद इमारती – ५६०९

* २४ तासांत शोध घेतलेल्या अतिजोखमीच्या व्यक्ती – ३५१८