मुंबईतले १९१ विभाग करोना प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या भागांमध्ये करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे भाग प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या भागांमध्ये नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच जे या भागांमध्ये राहतात त्यांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.

मुंबईतले काही भाग मंगळवारीच सील करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे मंगळवारी संध्याकाळी जो संवाद साधला त्यामध्ये ही गोष्ट नमूद केली होती. आता आज मुंबई महापालिकेने मुंबईतले १९१ विभाग सील केले आहेत. या भागांमध्ये ये-जा करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर या विभागात जे लोक सध्या रहात आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांनी स्वतःला होम क्वारंटाइन करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत १८० पेक्षा जास्त करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय़ घेण्यात आला आहे.