मुंबई : गणरायाला निरोप देताना गुरुवारी राज्यभरात २० जणांचा बुडून मृत्यू झाला. अमरावती, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, भंडारदरा, नांदेड, अहमदनगर, अकोला, सोलापूर, वाशीम आणि सातारा जिल्ह्य़ांमध्ये विसर्जनावेळी झालेल्या या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

राज्य पोलीस मुख्यालयाला मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथे चार, रत्नागिरीत तीन, नाशिकसह सिंधुदुर्ग, सातारा येथे प्रत्येकी दोन तर ठाणे, धुळे, बुलढाणा, अकोला आणि भंडारा येथे प्रत्येकी एकाचा विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे. नांदेड आणि वाशीम जिल्ह्य़ातही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रतिनिधीने कळविले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात कसाऱ्याजवळ कल्पेश जाधव (१५) याचा विसर्जनासाठी पाण्यात उतरल्यानंतर बुडून मृत्यू झाला.

त्र्यंबकेश्वरलगतच्या पहिणे येथे विसर्जन करताना युवराज राठोड (२२) याचा बुडून मृत्यू झाला. शहरात म्हसोबा पटांगण, तपोवन भागांत चार जण पाण्यात बुडाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.  नाशिकमधील आणखी एका मृताचा तपशील मिळालेला नाही. धुळे येथे विसर्जनासाठी पांझरा नदीत उतरलेला भागवत पवार हा पाण्यात वाहून गेला. शुक्रवारी त्याचा मृतदेह मिळाला.

अमरावती येथे पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर वाटोळे गावातील चौघांचा गणेशमूर्ती विसर्जित करताना बुडून मृत्यू झाला.  बुलढाणा जिल्हय़ाच्या नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे गुरुवारी रात्री गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या आर्यन विनोद इंगळे (११) याचा ज्ञानगंगा नदीपात्रात पडून बुडून मृत्यू झाला. त्याच्याबरोबर बुडालेला मयूर शंकर इंगळे (१४) याला वाचविण्यात मात्र यश आले.

भंडारा येथील डोळसर गावातील तलावात, कराड येथे कोयना नदीच्या पात्रात आणि अकोला येथील पाणी भरलेल्या खाणीत घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला.

तिघांचा शोध सुरू

नांदेडमध्ये विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडल्यानंतर नदीपात्रात पाणी वाढल्याने विसर्जनासाठी आलेले शहरातील तीन युवक वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. वाहून गेलेले तिन्ही युवक उत्तर प्रदेशातील आझमगड येथील असून कामाच्या शोधात ते नांदेड येथे आले होते. हदगाव तालुक्यातील जांभळा रोडवर गणरायाची आरती करताना शेषराव प्रकाश कोडगीरवार या गणेशभक्ताचा पाय घसरून खदाणीत पडल्याने मृत्यू झाला.

वाशीम जिल्ह्य़ाच्या मंगरूळपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घरगुती गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला.

१६ जणांना वाचविले..

पुण्यामधील मुळा, मुठा नदीवर विसर्जन करताना बुडालेल्या नऊ जणांना वाचविण्यात यश आले. नवी मुंबईत विसर्जनादरम्यान विजेचा धक्का बसल्यामुळे सात जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. वाशीममध्ये बुडालेल्या एका तरुणाला वाचविण्यात यश आले.

गिरगाव चौपाटीवर भंगारवेचकाचा मृत्यू :

विसर्जन प्रक्रिया आटोपल्यानंतर शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास मुंबईच्या गिरगाव चौपाटी येथे समुद्रात दिनेश नावाच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह चारच्या सुमारास सापडला. मात्र या घटनेचा गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेशी संबंध नसल्याचे डॉ. दादासाहेब भडकमकरमार्ग पोलिसांनी स्पष्ट केले. विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे अवशेष किनाऱ्यावर येतात. त्यातील धातूचे सांगाडे आणि प्लास्टीकच्या वस्तू वेचण्यासाठी किनाऱ्यावर कचरा वेचकांसह भंगार गोळा करणाऱ्यांचीही गर्दी होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार गिरगाव चौपाटीवरील विसर्जन शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता आटोपले. त्यानंतर ही घटना घडली.