दिवाळीतील सुट्टीकाळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार तेजीत असल्याने त्याला रोखण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेने पाच विभागांत ऑपरेशन ‘धनुष’ नावाने कारवाई सुरू केली आहे. यात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या २३ दलालांना अटक केली आहे. पश्चिम रेल्वेने तर १ ते १३ नोव्हेंबरमधील भूज-वांद्रे टर्मिनस कच्छ एक्स्प्रेसची संशयास्पद अशी २८२ ई-तिकीट रद्द केली आहेत. दिवाळी संपेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तात्काळ तिकीट मिळवण्यासाठीही तिकीट खिडक्यांसमोर अनधिकृत दलालही उभे केले जातात. याशिवाय काही दलाल प्रवाशांना हेरून त्यांना ई-तिकीट काढण्याचेही आमिष दाखवतात. तर तिकीट मिळत नसल्याने प्रवासीही दलालांकडे धाव घेतात. दिवाळी सुट्टीत याचे प्रमाण खूपच असते. त्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ या पाच विभागांत २६ ऑक्टोबरपासून दलालांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईला ऑपरेशन ‘धनुष’ असे नाव दिले आहे.

या कारवाईअंतर्गत वेगवेगळ्या एक्स्प्रेस गाडय़ांची २८७ तिकिटे जप्त केली आहेत. त्याची किंमत ९ लाख ४३ हजार ७२५ रुपये आहे. तर प्रवास पूर्ण झालेली एक हजार तिकिटे जप्त केली असून त्यांची २१ लाख १८ हजार रुपये किंमत आहे. यात २३ दलालांना अटक करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. तर २८७ तिकिटे आयआरसीटीसी रद्द करणार आहे.

पश्चिम रेल्वेची कारवाई

पश्चिम रेल्वेने कच्छ एक्स्प्रेसची आरक्षित केलेली २८२ ई-तिकिटे रद्द केली आहेत. दलालांकडून ही तिकिटे काढण्यात आल्याचा संशय असल्याने त्याची तपासणी केली जात असल्याचे सांगितले. १ ते १३ नोव्हेंबपर्यंत धावणाऱ्या कच्छ एक्स्प्रेसमधील या सर्व तिकिटांवरून जवळपास १ हजार ६९२ प्रवाशांचा प्रवास होणार आहे. दिवाळीतील वेगवेगळ्या तारखांमध्ये एकाच नावाच्या प्रवाशाने ही तिकिटे आरक्षित केल्याचे समोर आले आहे. त्याची सद्य:स्थिती तपासताना ती ‘ब्लॉक’ असल्याचे निदर्शनास आल्यास प्रवाशांनी मुंबई सेन्ट्रल, अहमदाबाद, गांधीधाममधील मुख्य आरक्षण अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.