23 October 2020

News Flash

टाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त

निर्बंध उठवण्यात आल्यामुळे रहिवाशांना दिलासा

प्रतिनिधिक छायाचित्र

निर्बंध उठवण्यात आल्यामुळे रहिवाशांना दिलासा

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मुंबईमधील तब्बल २८ हजार ९०० हून अधिक इमारतींमध्ये सापडलेले करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाले असून टाळेबंद केलेल्या या इमारतींवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. परिणामी, या इमारतींमधील रहिवासी बंधनमुक्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील ठिकठिकाणच्या इमारतींमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. इमारतींमध्ये वा आसपासच्या परिसरात करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी पालिकेने संबंधित संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक-दोन रुग्ण सापडल्यानंतरही संपूर्ण इमारत टाळेबंद करण्यात येत होती. त्यामुळे पालिकेविरुद्ध नाराजीचा सूर उमटू लागला होता. ही बाब लक्षात घेत पालिकेने आपल्या धोरणात बदल केला. करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर परिस्थितीनुरूप संपूर्ण इमारत वा तिचा काही भाग टाळेबंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण सापडू लागल्यानंतर टाळेबंद करण्यात येणाऱ्या इमारतींबाबतच्या धोरणात पुन्हा बदल करण्यात आले. आता एखाद्या इमारतीत १० पेक्षा अधिक किंवा दोनपेक्षा अधिक मजल्यांवर करोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती इमारत पूर्णपणे टाळेबंद करण्यात येत आहे. टाळेबंद के लेल्या इमारतींमधील रहिवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची जबाबदारी इमारतीमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर संसर्ग पसरू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज दोन हजारांहून अधिक व्यक्तींना करोनाची बाधा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे टाळेबंद इमारतींची संख्याही वाढत आहे. करोनाबाधित सापडल्याने आजघडीला तब्बल १०,२८९ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या आहेत. मात्र करोनाबाधित सापडल्याने यापूर्वी टाळेबंद केलेल्या २८,९७६ इमारतींनी टाळेबंदीचा काळ पूर्ण केला असून तेथे नवे रुग्ण आढळून आले नाहीत. त्यामुळे या इमारती टाळेमुक्त झाल्या आहेत. परिणामी, या इमारतींमधील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

एखाद्या परिसरात मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. आजघडीला ६७६ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहेत. तर रुग्ण करोनामुक्त झाल्याने आणि नवे रुग्ण आढळून न आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून तब्बल १,१०२ ठिकाणे मुक्त करण्यात आले आहेत.

२९,३९,२७० संशयित रुग्णांचा शोध

करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल २९,३९,२७० संशयित रुग्णांचा शोध घेऊन पालिकेने करोना संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी ११,५८,१०२ अतिजोखमीच्या, तर १७,८१,१६८ कमीजोखमीच्या गटातील आहेत. आतापर्यंत एकूण २५,११,७११ जणांनी विलगीकरणाचा काळ पूर्ण केला आहे. तर चार लाख २५,५९९ संशयित गृहविलगीकरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 2:10 am

Web Title: 28900 buildings in mumbai free from restrictions zws 70
Next Stories
1 सार्वजनिक वाहनांत मुखपट्टीविना प्रवेशास मज्जाव
2 चित्रनगरीजवळून ‘एमडी’ हस्तगत
3 अन्य नोकरदारांनाही रेल्वे प्रवासाची मुभा हवी!
Just Now!
X