09 August 2020

News Flash

राज्यात २९४० नवीन रुग्ण

राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.

धारावी येथून  शुक्रवारी स्थलांतरीत कामगार मोठय़ा संख्येने आपल्या राज्यांमध्ये रवाना झाले.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत एकूण २७,२५१ रुग्णसंख्या झाली असून, राज्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत २७ करोना रुग्ण मरण पावले.

राज्यात आज ८५७ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार १५४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

६३ जणांचा मृत्यू

राज्यात ६३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापुरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

मुंबईत १७५१ नवीन रुग्ण

मुंबईत शुक्रवारी १७५१ बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. एकूण रुग्णांचा आकडा २७,०६८ झाला आहे. तर शुक्रवारी आणखी २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. करोनाबळींची संख्या ९०९ वर गेली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १२ दिवसांचा आहे. मुंबईतील दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी सर्वाधिक १७५१ रुग्ण आढळले. यापैकी २७६ जणांचे प्रलंबित अहवाल खासगी प्रयोगशाळांनी संकेतस्थळावर नोंदवले. दरम्यान, शुक्रवारी ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७०८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  धारावीत ५३ नवे रुग्ण सापडले आहेत. धारावीतील रुग्णांचा एकूण आकडा १४७८ वर गेला आहे. तर आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ५७ झाली आहे. यातही माटुंगा लेबर कॅम्प भागातून गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ३९८ रुग्णांची भर

जिल्ह्य़ात शुक्रवारी ३९८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ५ हजार ६८ इतका झाला आहे. तर, शुक्रवारी ४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५५ झाली आहे. ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरात १९७ तर, कल्याण-डोंबिवली शहरात ५८, अंबरनाथ शहरात ६, उल्हासनगर २, बदलापूर १०, मीरा-भाईंदर  ५१, नवी मुंबई ६३ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ११ नवे रुग्ण आढळले आहेत. ठाणे शहरामध्ये करोनाची एकूण रुग्णसंख्या १ हजार ७५७ इतकी झाली आहे.

वसईत २५ नवे रुग्ण

वसई-विरार शहरात शुक्रवारी २५ नवे रुग्ण आढळले, तर आठ रुग्ण करोनामुक्त झाले. वसईतील  २५ रुग्णांमध्ये नालासोपारा शहरातील ११, विरारमधील ८ आणि वसईतील ५ रुग्णांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:43 am

Web Title: 2940 new patients in the state abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधित मृतदेहांच्या दफनविधीचा मार्ग मोकळा
2 वैद्यकीय चाचणी केल्यानंतर २४ तासात अहवाल द्या!
3 रुग्णालये ओसंडली..
Just Now!
X