सीएसएमटी स्थानकात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे; रेल्वे सुरक्षा दलाचे ३३१ कमांडो तैनात

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी सज्ज असल्याचा दावा रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आला आहे. या हल्ल्याला येत्या २६ नोव्हेंबर रोजी दहा र्वष पूर्ण होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर पश्चिम व मध्य रेल्वेकडून सुरक्षेनिमित्त केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

सीसीटीव्ही, फोर्स वन कमांडोबरोबरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांचीही भर पडली आहे. खास करून गर्दीच्या स्थानकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवरील सहा गर्दीच्या व महत्त्वाच्या स्थानकांवर ९४६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून यातील एकटय़ा दहशतवादी हल्ला झालेल्या सीएसएमटी स्थानकात ३०० कॅमेरे आहेत. पश्चिम रेल्वेवरील मुंबईतील सर्व स्थानकांवरही सध्याच्या घडीला १,१२८ कॅमेरा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहेत. फोर्स वनकडून प्रशिक्षित पश्चिम रेल्वेवर १२५, तर मध्य रेल्वेवरही २०६ कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

२६/११ दहशतवादी हल्ल्यात सीएसएमटी स्थानकात दोन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक प्रवाशांचा मृत्यू व काही प्रवासी जखमी झाले होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वेवरील सुरक्षा व्यवस्थेत टप्प्याटप्यात वाढही करण्यात आली. यात खासकरून गर्दीच्या स्थानकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. यासंदर्भात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीत, सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटी, ठाणे, कल्याण गर्दीच्या व महत्त्वाच्या स्थानकात एकूण ९४६ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. यामध्ये सीएसएमटी स्थानकात ३०० कॅमेरे असून दादर स्थानकात १२०, कुर्ला स्थानकात १११, एलटीटी स्थानकात १५३, ठाणे स्थानकात ११३ आणि कल्याण स्थानकात १४९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर आणखी २०६ कॅमेऱ्यांची भरही पडली आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एकूण तीन हजार कॅमेरे आहेत. त्याशिवाय या सहा स्थानकांवर १३ बॅगेज स्कॅनर, डोअर मेटल डिटेक्टर ८५, वाहन तपासणी यंत्रणा एक आणि बॉम्बनाशक पथक एक आहे. याशिवाय वांद्रे, एलटीटी, ठाणे येथे डॉग्ज स्क्वॉडही आहेत. एखादी घटना घडल्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना रस्ते मार्गेही जाऊन पुढील रेल्वे स्थानक गाठता यावे यासाठी ५५ दुचाकी आणि चारचाकी वाहनही उपलब्ध केले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. २७० बुलेट प्रूफ जॅकेटसह सहा मोबाइल बुलेट प्रूफ मोर्चाही जवानांसाठी आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या १०९ जवानांना अग्निशमन दलामार्फत प्रशिक्षणही दिले आहे. त्यांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे २५९ जवानही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

पश्चिम रेल्वेनेही सज्ज असल्याचा दावा करत सध्या १,१२८ सीसीटीव्ही सर्व स्थानकांत बसविल्याचे सांगितले. पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर २४ तास ५४८ आरपीएफ जवान तैनात केले असून त्यांचासोबत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ३२९ जवान आणि लोहमार्ग पोलीसही आहेत. सप्टेंबरपासून चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली आणि सुरत स्थानकात पाच बॅगेज स्कॅनर मशिन बसविण्यात आल्या आहेत. बॉम्ब शोधक व नाशक उपकरणासह पाच जणांचे पथक यांसह १० प्रशिक्षित श्वानांचे पथकही सज्ज आहे.