पुणे, कल्याण-डोंबिवलीत संख्या जास्त; रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट

राज्यात नव्याने ४८७८ नव्या रुग्णांना करोनाचे निदान झाले. लागोपाठ तीन दिवस पाच हजारांचा आकडा पार केल्यावर चौथ्या दिवशी रुग्ण संख्या काही प्रमाणात घटली आहे.

गेल्या ४८ तासांत राज्यात २४५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात ७८५५ जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ही १ लाख, ७४ हजार, ७६१ एवढी झाली. गेल्या २४ तासांत मुंबईत ९०३ रुग्णांची भर पडली. पुणे शहर (८१६), कल्याण-डोंबिवली (४६२), ठाणे (२६६), मीरा-भाईंदर (१६१), नवी मुंबई (१७८) नव्या रुग्णांची भर पडली.

मुंबईत ९०३ नवे बाधित, ३६ जणांचा मृत्यू

मुंबईत आणखी ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७७ हजाराच्यापुढे गेली आहे. तर ४८ तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४५५४ वर गेला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून रोज हजार ते दीड हजार रुग्णांची रोज भर पडत असताना मंगळवारी बाधितांची संख्या काहीशी कमी झाली. ९०३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७७,१९७ झाली आहे. तर ६२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ४४,१७० म्हणजेच ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २८,४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी ८१८ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.