एसटी, बेस्ट आणि रेल्वे या सार्वजनिक वाहतूक सेवा कार्यरत ठेवून टाळेबंदी शिथिलीकरणाच्या प्रक्रियेला हातभार लावणाऱ्या परिवहन आस्थापनांमधील तब्बल २५५ कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. त्यात एसटी-बेस्टच्या ७८, तर रेल्वेच्या १७७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या एसटीच्या १,४२३ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. यातील ५११ कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून ८६९ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत, तर करोनाने आतापर्यंत ४३ कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. कर्मचारी प्रत्यक्षात कामावर असताना करोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. पाच पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव एसटी महामंडळाकडे सादर झाले आहेत. याशिवाय करोनामुळे मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना  पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरीही दिली जाणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेतही  बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्त कर्मचारी व कु टुंब सदस्यही आहेत. आतापर्यंत १,८०० जणांना रुग्णालयातून  घरी पाठवण्यात आले. १६० जणांवर उपचार सुरू आहेत.

बेस्टच्या ३५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

बेस्टचे आतापर्यंत २००५ कर्मचारी करोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के  असल्याचे उपक्र माकडून सांगण्यात आले, तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुक्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १,३४७ कर्मचारी बेस्टच्या परिवहन सेवेतील असून विद्युत पुरवठामधील ३१४, अभियंता विभागातील २४४ आहेत. एप्रिल महिन्यात बेस्टच्या ४० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर मे महिन्यात ३२१, जूनमध्ये ३४३, जुलैमध्ये ७८३ करोनाबाधित कर्मचारी आढळले. नंतर या संख्येत घट होत गेली आणि ऑगस्ट महिन्यात ४६५ तर सप्टेंबर महिन्यात ३०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली.

राज्यात विक्रमी २२ हजार रुग्ण बरे

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाचे २१,६५६  नवे रुग्ण आढळले असले  तरी याच काळात २२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. एवढे रुग्ण दिवसभरात बरे होण्याचा उच्चांक ठरला. गेल्या २४ तासात राज्यात करोनामुळे ४०५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात करोनामुळे ३१,७९१ जणांचा मृत्यू झाला. नवे रुग्ण आढळले त्यापेक्षा अधिक रुग्ण दिवसभरात बरे होऊन घरी परतल्याने आरोग्य विभागाने सुटके चा निश्वास टाकला. राज्यात सध्या ३ लाख ८८७ रुग्ण उपचाराधीन आहेत.