रविवारी मुंबईत ७८६ रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील करोनावाढीचा दर खाली आला असून, दिवसभरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत सुमारे पाच टक्के अहवाल बाधित येत आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर घसरून ०.२६ टक्के झाला आहे. दिवाळीनंतर काही दिवस हा दर ०.३७ टक्क्यांपर्यंत वाढला होता. मात्र आता रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली असून, दर दिवशी ८००च्या आत रुग्ण आढळत आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २७२ दिवस झाला आहे.

नवीन ७८६ रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख  ८६ हजारांच्या पुढे गेली आहे, तर एका दिवसात दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच १६५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ६१ हजारांहून अधिक म्हणजेच ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

गेल्या आठवडय़ाभरापासून दर दिवशी सलग १६ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत, मात्र त्यापैकी केवळ ५ टक्के अहवाल बाधित येत आहेत.

दिवसभरातील मृत्यूच्या संख्येतही घट झाली असून रविवारी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात ११ पुरुष व दोन महिला होत्या.

मृतांचा एकूण आकडा १० हजार ९०२ झाला आहे. सध्या मुंबईत १३ हजार १३२ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईतील ४६६ झोपडपट्टय़ा व चाळी प्रतिबंधित असून ५४२८ इमारती टाळेबंद आहेत.