News Flash

राज्यभरात उद्यापासून संपूर्ण महिनाभर क्षय आणि कुष्ठ रुग्ण संयुक्त शोध अभियान

गृहभेटींद्वारे ८ कोटीहून अधिक लोकसंख्येची होणार तपासणी

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

करोना काळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षय व कुष्ठ रुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षय रुग्ण शोध व कुष्ठ रुग्ण शोध अभियान” उद्यापासून दि. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागातील संख्या ६ कोटी ८२ लाख २३ हजार ३९८ एवढी असून जोखीमग्रस्त शहरी लोकसंख्या १ कोटी ८४ लाख एवढी आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

कुष्ठ रुग्ण व क्षय रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार या दोन्ही आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीचा सामना तर करावा लागतोच त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना संसर्गाचा धोका वाढून त्याची साखळी अखंड रहाते. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध, निदान आणि उपचार करण्याकरिता उद्यापासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, नुकताच या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकाक्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे, डॉ. व्यास यांनी सांगितले.

सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील त्यात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण मोफत औषधोपचार आरोग्यसंस्थेकडून करण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 7:56 pm

Web Title: a month long joint search operation for tb and leprosy across the maharashtra from tomorrow scj 81
Next Stories
1 करोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारची खासगी रुग्णालयांपुढे सपशेल शरणागती
2 शिवसेनेने भगवा तर केव्हाच सोडला, पण आता केवळ हिरवा खांद्यावर घेणं शिल्लक – भातखळकर
3 ‘बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील पण’…अजान स्पर्धेवरुन प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल
Just Now!
X