अवघ्या काही दिवसांपूर्वीच अदानी होल्जिंग्जनं मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा पूर्ण ताबा घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनात देखील अदानी समूहानं ५०.५ टक्के हक्क ताब्यात घेतले असताना सोमवारी अदानी समूहानं जाहीर केलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू झाली होती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्च लिमिटेडनं आपलं मुख्यालय गुजरातला हलवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचं मुख्यालय देखील मुंबईतून गुजरातला हलवलं जाणार, असं म्हटलं जात होतं. मात्र, मुंबई एअरपोर्टचं मुख्यालय गुजरातला हलवणार असल्याची चर्चा ही फक्त अफवा असल्याचं ‘अदानी’ समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजे १३ जुलै रोजी अजानी एअरपोर्ट होल्डिंग्जनं GVK ग्रुपकडून मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर, “अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.” असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यासोबतच, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आर. के. जैन याना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आज अदानी समूहाने यासंदर्भात खुलासा केला आहे.

 

अदानी समूहातील कंपन्यांची ‘सेबी’द्वारे चौकशी

अदानी समूहाचा ट्विटरवरून खुलासा

अदानी समूहानं आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये यांदर्भात खुलासा केला आहे. “मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादला हलवण्यात येणार असल्याच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मात्र, आम्ही ठामपणे सांगतो की मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाची मुख्यालयं मुंबईमध्येच राहणार आहेत. मुंबईकरांना गर्व वाटावा आणि आमच्या विमानतळ व्यवस्थेतून हजारोंसाठी रोजगार निर्माण व्हावा, यासाठीची आम्ही बांधील आहोत”, असं अदानीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला स्थलांतरित

अदानी समूहाकडे कोणती विमानतळं?

अदानी ग्रुपकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.