देशभरातील डाव्या-उजव्या विचारांच्या संघटनांमध्ये वाद कायम
दिल्लीतील ‘जेएनयू’मधील वादावरून मुंबई विद्यापीठातही वातावरण तापविण्याचा विद्यार्थी संघटनांचा प्रयत्न मंगळवारी फुसका बार ठरला.
‘देशद्रोहा’च्या मुद्दय़ावरून देशभरातील डाव्या-उजव्या विचारांच्या संघटनांमध्ये सध्या आक्रस्ताळी वाद सुरू आहे. ‘अभाविप’ या भाजपप्रणीत विद्यार्थी संघटनेने हा वाद फर्गसन, पुणे विद्यापीठ आदी पाठोपाठ देशातील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या आवारातही आणण्याचा प्रयत्न केला. ‘जेएनयूतील सत्य’ सांगण्याच्या नावाखाली अभाविपने विद्यापीठाच्या कलिना संकुलात सभेचे आयोजन केले होते. परंतु विद्यापीठातील सर्वसामान्य विद्यार्थी व शिक्षकांनीही दुर्लक्ष केल्याने आंदोलनाद्वारे येथील वातावरण तापविण्याचा संघटनेचा प्रयत्न केविलवाणा ठरला.

या सभेला विद्यापीठ प्रशासनाने आधीच परवानगी नाकारली होती. त्यामुळे, संकुलाच्या प्रवेशद्वारावर अभाविपला ही सभा उरकावी लागली. त्यातच अवघ्या २० ते २५ विद्यार्थ्यांनी या सभेला उपस्थिती लावल्याने वातावरणनिर्मितीही झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे सभेला उपस्थित असलेल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांपेक्षा त्याचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीच संख्या जास्त होती. त्यामुळे, आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी विद्यापीठाच्या १५ ते २० सुरक्षा रक्षकांचे कडेच पुरेसे झाले. बंदोबस्ताकरिता आलेल्या पोलिसांनाही त्यामुळे काहीच काम लागले नाही.
या सभेत ‘जेएनयू का सच’ सांगण्यासाठी दिल्लीतून पाचारण करण्यात आलेल्या अभाविपच्या संघटन मंत्री ललित पांडेय याचे भाषणही काश्मीर, विचार स्वातंत्र्य, राष्ट्रवाद आदी विषयांवरच घुटमळत राहिले. त्यामुळे, विद्यार्थी-शिक्षक क्षणभर थबकतही नव्हते.

परीक्षार्थीना त्रास
प्रवेशद्वारावर नारेबाजी सुरू असतानाच येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्यापीठाच्या आरोग्य भवनातील तळमजल्यावर पत्रकारितेचे विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यामुळे, त्यांना या कलकलाटाचा त्रास झाला. दुपारी सव्वाचापर्यंत हा गोंधळ सुरू होता. तोपर्यंत परीक्षा देणारे विद्यार्थी त्रासून गेले होते.

तीही डोकी चारच
दुपारी तीनच्या सुमारास अभाविपने घोषणाबाजी करत सभा सुरू केली. काहीच मिनिटात दुसऱ्या बाजूला ‘युनिव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमॉक्रेसी अ‍ॅण्ड इक्लॅलिटी’ (यूसीडीई) नामक डाव्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनीही ‘आरएसएस, फासीवाद मुर्दाबाद’ म्हणत अभाविपच्या घोषणांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे विद्यार्थीही उणेपुरे चारच जण. त्यामुळे, राष्ट्रवादाच्या मुद्दय़ावरून जेएनयूसह देशाच्या विविध शिक्षणसंस्थांमध्ये डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटना आणि पक्षांमध्ये सुरू असलेले वादाचे चित्र मुंबई विद्यापीठाच्या उंबरठय़ावर फारच केविलवाणे दिसून आले.