01 October 2020

News Flash

‘वादग्रस्त’ अशोक चव्हाण व अजित पवार यांनी गड राखले

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये यश मिळवितानाच भाजपने शिवसेनेलाही काही ठिकाणी धक्का दिला.

 

नगरपालिका निवडणुकांच्या आतापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये बाजी मारली असली, तरी नांदेडमध्ये अशोक चव्हाण तर पुण्यात अजित पवार या दोघांना आपापले गड कायम राखण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे अशोकराव आणि अजितदादा यांच्यावर गैरव्यवहार किंवा अनियमिततेचा शिक्का बसला असून उभय नेते चौकशीच्या  फेऱ्यात अडकले आहेत.

नगरपालिका निवडणुकांमध्ये तीन टप्प्यांत भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारली. विदर्भ या बालेकिल्ल्यात भाजपला निर्विवाद यश मिळाले. पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव केला. उत्तर महाराष्ट्राचा गड कायम राखला. पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात चांगले यश मिळाले नसले तरी पुढील दोन टप्प्यांत लातूर आणि औरंगाबादमध्ये भाजपने आघाडी घेतली. कोकणात दोन नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये यश मिळवितानाच भाजपने शिवसेनेलाही काही ठिकाणी धक्का दिला.

नांदेड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये भाजपला वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. नांदेडमध्ये ११ पैकी आठ पालिका जिंकून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी निर्विवाद यश प्राप्त केले.  अलीकडेच विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जिंकली होती. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध सारे एकत्र, अशी राजकीय परिस्थिती असतानाही चव्हाण यांनी बाजी मारली. तळागाळापर्यंत मतदारांशी संपर्क आणि मुख्यमंत्रिपदी असताना जिल्ह्य़ात केलेली कामे या बाबी अशोकरावांसाठी फायद्याच्या ठरतात. याशिवाय जिल्ह्य़ात पक्षाची संघटनात्मक ताकदही उपयोगी ठरते. मध्यंतरी चव्हाण यांचे अनेक सहकारी काँग्रेस सोडून भाजपवासी झाले.  ‘आदर्श’ घोटाळ्यामुळे अशोकरावांच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम झाला असला तरी नांदेडमध्ये त्यांच्या प्रतिमेला धक्का बसलेला नाही.

‘आदर्श’मुळे अशोक चव्हाण वादग्रस्त ठरले असतानाच सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. पुणे जिल्ह्य़ात अजित पवार यांना राजकीय शह देण्याकरिता भाजपने कंबर कसली होती. अगदी बारामतीमध्ये भाजपने सारी ताकद लावली होती. तरीही बारामतीत ३९ पैकी ३५ जागा जिंकून अजितदादांनी बारामतीमध्ये आपले वर्चस्व अबाधित असल्याचे स्पष्ट केले. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमुळे अजितदादांच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्यातच त्यांच्या आक्रमक आणि तापट स्वभावामुळे त्यांनी पक्षातील अनेकांना दुखावले आहे.

दिग्गजांना धक्का

पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, डॉ. पतंगराव कदम आदी नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये यश मिळविले असले तरी अशोकरावांप्रमाणे जिल्ह्य़ावर वर्चस्व अन्य कोणत्याही नेत्याला प्रस्थापित करता आलेले नाही.

राष्ट्रवादीमध्ये  दिग्गज नेत्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये फटका बसला असतानाही अजितदादांनी पुण्याचा गड कायम राखला आहे.

नगरपालिका निवडणुकीत मराठवाडय़ात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले असून, आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधील परिवर्तनाची नांदी आहे. नांदेडमध्ये साऱ्या विरोधकांनी एकत्र येऊनही मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्य़ात पाच सभा घेतल्या. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

पुणे जिल्हा व विशेषत: बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या पराभवाकरिता भाजपची मंडळी हरप्रकारे प्रयत्न करीत होते. मोठय़ा प्रमाणावर पैशांचा वापर केला गेला. पण बारामती आणि पुणे जिल्ह्य़ाच्या अन्य भागांमध्ये मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास व्यक्त केला. पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीच नं. १ वर आहे.

अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2016 2:40 am

Web Title: ajit pawar and ashok chavan win in regional election
Next Stories
1 झोपु योजनेत ३२३ चौरस फुटांचे घर
2 एसटीच्या १८ हजार  गाडय़ांमध्ये वाय-फाय
3 ‘इस्रो’मधील वैज्ञानिकाशी थेट संवादाची संधी
Just Now!
X