News Flash

मुंबईत चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत निरुत्साह

२ हजार २०० पैकी ९४१ जणांकडून मतदान; मंगळवारी कोल्हापूर येथून निकाल जाहीर होणार

२ हजार २०० पैकी ९४१ जणांकडून मतदान; मंगळवारी कोल्हापूर येथून निकाल जाहीर होणार

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबईतील मतदान केंद्रावर निरुत्साह दिसून आला. महामंडळाच्या मुंबईतील २ हजार २०० मतदारांपैकी अवघ्या ९४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मुंबईतील एकूण मतदान अवघे ४० ते ४५ टक्के झाले असल्याचे सांगण्यात येते. मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिराच्या आवारात असलेल्या पु. ल. देशपांडे कला अकादमी प्रांगणात मतदान झाले.

महामंडळाच्या या निवडणुकीसाठी या वेळी एकूण नऊ पॅनेल्स रिंगणात होती. चित्रपटाशी संबंधित विविध १४ विभागांसाठी एकूण १२२ उमेदवार निवडणूक िरगणात होते. मुंबईसह कोल्हापूर आणि पुणे या तीन केंद्रांवर हे मतदान पार पडले. मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर येथे खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरात ९४१ पैकी ७१७ जणांनी तर पुण्यात ८५४ पैकी ४७६ जणांनी मतदानात सहभाग नोंदविला. या निवडणुकीसाठी एकूण ३ हजार ८०० मतदार होते. मुंबई व पुण्याहून मतपेटय़ा कोल्हापूर येथे पाठविण्यात येणार असून सर्व मतपेटय़ांमधील मते एकत्र करुन मतमोजणी कोल्हापूर येथेच २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर लगेच तेथूनच निकाल जाहीर केला जाणार आहे.

मुंबईचे एकूण मतदान कमी झाले असले तरीही मतदानासाठी खूप उत्साह होता. आलेली कलाकार मंडळी मतदान झाल्यानंतरही तेथे थांबून एकमेकांशी गप्पा मारण्यात आणि जुन्या आठवणीत रंगली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यासह रमेश देव, अशोक सराफ, नयना आपटे, सचिन, मोहन जोशी, डॉ. गिरीश ओक, प्रदीप वेलणकर, किरण शांताराम, चंद्रकांत कुलकर्णी, सुनील बर्वे, पुष्कर श्रोत्री आणि अन्य कलाकारांनी मतदान केले.

सुलोचना दीदी यांचेही मतदान

कोल्हापूर आणि पुण्याच्या तुलनेत मुंबईत मतदानाचा निच्चांक होता. काही मान्यवर कलाकार, तंत्रज्ञ आणि संबंधित मंडळी वगळता अन्य सर्वानी मतदानाकडे पाठ फिरविली. त्या पाश्र्वभूमीवर ८८ वर्षीय सुलोचना दीदी यांनी या वयातही मतदानाच्या ठिकाणी येऊन मतदानाचे आपले कर्तव्य आवर्जून बजाविले.

तरुण कलाकार मतदारच नाही

मराठी चित्रपट सृष्टीत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून जी तरुण पिढी काम करत आहे त्यापैकी ७५ टक्के कलाकार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्यच झालेले नाहीत. चित्रपट सृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार महामंडळाचे सदस्य आहेत ते रविवारी मतदानालाही आले. त्या पाश्र्वभूमीवर काही अपवाद सोडले तर तरुण कलाकार महामंडळाचे सदस्य नसणे ही बाब खेदजनक असल्याचे महामंडळाचे मावळते अध्यक्ष विजय पाटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 2:35 am

Web Title: all india marathi film corporation elections
Next Stories
1 बेकायदा सावकारीला सरकारचे संरक्षण
2 हृदयनाथ मंगेशकर, शांता गोखले, प्रदीप मुळ्ये, शफाअत खान मानकरी
3 चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पुस्तकाला यंदाचे केशवराव कोठावळे पारितोषिक
Just Now!
X