राज्यातील टाळेबंदी अधिक शिथिल करताना गुरूवारपासून मुंबईतील मेट्रो रेल्वे तसेच राज्यभरातील आठवडी बाजार, ग्रंथालये सुरू करण्यास राज्य सरकारने बुधवारी परवानगी दिली. मात्र धार्मिक स्थळे,शाळा-महाविद्यालय, चित्रपटगृहे, व्यायामशाळा तसेच सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे ३१ ऑक्टोबपर्यंत बंदच राहणार आहेत.

गेल्या पंधरा दिवसात राज्यातील करोनाबाधितांची कमी झालेली संख्या आणि रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण यांचा विचार करून सरकारने सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार निर्बंध आणखी शिथिल करताना मुंबईतील बेस्ट बस सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली वर्सोवा -घाटकोपर मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

शाळा, महाविद्यालये तसेंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबपर्यंत बंद राहणार आहेत. परंतु शाळांना ५० टक्के शिक्षक तसेच शिक्षके तर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली समुपदेशन याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.  तसेच कौशल्यविकास संस्था, लघुउद्योग प्रशिक्षण संस्था आदींना प्रशिक्षण सुरू करण्यास,व्यापारी प्रदर्शनास परवानगी देण्यात आली आहे. पदवी आणि  पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइनच सुरू राहणार असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचे पालन करुन कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याची राज्यपालांची मागणी मात्र सरकारने फेटाळली असून राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सोहळ्यावरील बंदी आणखी काही दिवस कायम राहणार आहे.

ग्रामीण अर्थकारणाला दिशा..

ग्रामीण भागाचे अर्थकारण आठवडी बाजारावर अवलंबून असून २०१८ च्या आकडेवारीनुसार राज्यभरात ११० हून अधिक आठवडी बाजार भरतात. त्याची एकूण उलाढाल ८०० कोटींहून अधिक आहे. शेतकरी आणि ग्राहकांसाठी हा बाजार किफायतशीर मानला जातो. गेल्या काही वर्षांत मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर या शहरांत या बाजाराचे जाळे  वाढत आहे.

निर्णय काय?

राज्यभरात करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील आठवडी बाजार, जनावारांचे बाजार सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी सर्व दुकानांची वेळ वाढवून सकाळी ९ ते रात्री नऊपर्यंत करण्यात आली आहे.