भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रवेश घेतला. त्यांच्या शैक्षणिक जीवनाची तेव्हापासून सुरुवात झाली. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी आहे. हा दस्तऐवजही शाळेने जपून ठेवला आहे. सातारामधीलच प्रवर्तन संघटनेचे अध्यक्ष अरुण जावळे यांनी ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यात शाळाप्रवेश दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. दोन्ही मंत्र्यांनी त्याची दखल घेऊन बाबासाहेबांनी शाळेत पहिल्यांदा प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली. त्यांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. जगात गौरव होत असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ते ठरले. ते आजन्म विद्यार्थी होते. म्हणून त्यांचा शाळाप्रवेश दिवस राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात सांगण्यात आले आहे.