कोटय़वधींची उलाढाल; नववर्षांपर्यंतच्या मुहूर्तावर मोहोर

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दिवाळीपासून ते नववर्षांपर्यंतचे मुहूर्त हे बॉलीवूडच्या बडय़ा चित्रपटांच्या नावावर नोंदले जात असले तरी यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. यंदा तिकीटबारीवर कोटी रुपयांची भरारी घेण्यात मराठी चित्रपट आघाडीवर आहेत. दिवाळीत ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सारखा सगळ्याच अर्थाने भव्य असलेला चित्रपट दणकून आपटल्यानंतर मराठी प्रेक्षक ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाकडे वळले. या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेल्या पाच मराठी चित्रपटांनी गेल्या दोन महिन्यांत कोटय़वधींची उलाढाल केली आहे.

वर्ष संपता संपता प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनी सलगपणे तिकीटबारीवर यश मिळवण्याची ही पहिलीच घटना आहे. ऐन दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘..घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. पहिल्या तीन दिवसांत ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चे खेळ कमी करून ‘..घाणेकर’चे खेळ वाढवण्यात आले.

ट्रेड विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने दोन आठवडय़ापेक्षाही कमी वेळेत १६ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर नागराज मंजूळे यांची निर्मिती असलेला ‘नाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याही चित्रपटाने पहिल्या आठवडय़ातच १४ कोटी रुपयांची कमाई केली. ‘कुठलाही व्यावसायिक मसाला नसलेला, एका लहान मुलाचे भावविश्व हळुवार टिपणारा हा चित्रपट इतका यशस्वी ठरेल, अशी कल्पना कुणालाच नव्हती. मराठी चित्रपटात एक प्रकारची क्रांतीच झाली आहे की काय,’ असे वाटून गेल्याचे मंजुळे यांनी सांगितले.

देशभरात साडेचारशे चित्रपटगृहांतून ‘नाळ’चे दिवसाला ११ हजार खेळ दाखविले गेले. अन्य भाषिक प्रेक्षकांनीही या चित्रपटाला प्रतिसाद दिला. ‘नाळ’ चित्रपटानेही आजवर २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या मागोमाग प्रदर्शित झालेल्या प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटानेही आजवर २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जिथे जिथे तथाकथित विकासाचा फटका गावांना, शहरांना बसला तिथे या चित्रपटाला त्याच्या विषयामुळे जास्त प्रतिसाद मिळाला.

पुणे, पंढरपूर, कोल्हापूर, नाशिक, पालघर, ठाणे, सोलापूर, जळगाव, नाशिकबरोबरच कर्नाटकमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती या चित्रपटाचे पणन सल्लागार विनोद सातव यांनी दिली. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटानेही पहिल्याच आठवडय़ांत सात कोटी रुपयांची कमाई केली. तर लगोलग प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘माऊ ली’ या चित्रपटानेही पहिल्याच दिवशी ३ कोटी ४५ लाख रुपयांची विक्रमी कमाई केली. पाच मराठी चित्रपट एकामागोमाग सुपरहिट होतात, हे मराठी चित्रपटाचे आणि रसिकाचे यश असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.

‘साधा विषयही प्रभावी’

या दोन महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट वेगवेगळ्या विषयांवरचे होते. मराठी प्रेक्षकाला चांगल्या आशयाची भूक किती असते. हे चित्रपट काही अंतराने प्रदर्शित झाले असते तरी चालले असते. ‘नाळ’ने मनोरंजनाच्या पठडीतला नसूनही यश मिळवले. आता ‘माऊली’ सोडून चित्रपटगृहात असलेल्या इतर चित्रपटांपेक्षा ‘नाळ’ ने जास्त कमाई केली आहे. साध्या विषयाला मिळालेली ही प्रेक्षकपसंती मिळते तेव्हा हे श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाचं आहे, असे झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी सांगितले.