सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव; १२८ लॅण्डिंग पॉइंट सुरक्षेविनाच

मुंबई आणि जवाहरलाल नेहरू या दोन मोठय़ा बंदरांची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अखत्यारीत असून या व्यतिरिक्त असलेल्या ४८ छोटय़ा बंदरांची सुरक्षा व्यवस्था महाराष्ट्र मेरिटाइम मंडळाकडे आहे. परंतु या छोटय़ा बंदरांचा अतिरेक्यांकडून वापर होण्याची शक्यता असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने दिलेला असतानाही या छोटय़ा बंदरांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे म्हणावे तसे लक्ष पुरविण्यात आलेले नाही, असे शासनाला सादर झालेल्या एका अहवालातच म्हटले आहे. याशिवाय ४४१ लॅण्डिंग पॉइंटची पोलीस, नौदल आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे पाहणी केली असता याठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही, थर्मल कॅमेरा बसविणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, १२८ लॅण्डिंग पॉइंटही सुरक्षेविना असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रामुख्याने समुद्रमार्गे हल्ला होण्याची अद्यापही दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगडला धोका आहे. राज्यातील १२ छोटी बंदरे खासगी यंत्रणेच्या ताब्यात आहेत. याशिवाय १७ खासगी तर १०९ सरकारी नियंत्रण असलेल्या जेट्टी आहेत. याशिवाय १७३ अधिकृत मासळी उतरविण्याची ठिकाणे आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे नीट ऑडिट झालेले नाही, असेही गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र मेरीटाइम मंडळाला अहवाल सादर करण्यात आला आहे. परंतु अद्याप सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. डहाणू, करंजा, रेवदांडा, दिघी, केळशी दाभोळ, जयगड, रत्नागिरी आणि रेडी (सिंधुदुर्ग) ही छोटी बंदरे खासगी यंत्रणेच्या ताब्यात आहेत. तेथील सुरक्षा व्यवस्थेबाबत उपाय योजणे आवश्यक आहे. हल्ल्याचे सावट असताना अशी क्षुल्लकशी बाबही महागात पडू शकते, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र वितरित करण्यास मस्त्य विभागाने सुरुवात केली आहे. एकूण दोन लाख ११ हजार ८५७ मच्छीमारांपैकी एक लाख ४० हजार ७३६ जणांना ओळखपत्रे वितरित झाली आहे. अद्याप ७१ हजार १२१ मच्छीमारांना ओळखपत्रे देण्यात आलेली नाही. मुंबई हल्ल्याला आठ वर्षे पूर्ण होत आली तरी ओळखपत्र वितरण अपूर्ण असावे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचाच गैरफायदा अतिरेक्यांकडून घेतला जाऊ शकतो, याकडेही अंतर्गत सुरक्षेशी संबधित सूत्रांनी लक्ष वेधले. बधवार पार्कसारख्या परिसरातून अतिरेकी शिरू शकतात, असे पत्र लिहिणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनराज वंजारी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची किंमत मुंबईकरांना मोजावी लागली होती. परंतु आता या चुका पुन्हा नको, असे मत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

आतापर्यंत झालेल्या सुधारणा

  • ५४० सागर रक्षक दल स्थापन; समुद्रकिनारी असलेल्या गावातील ५,१८८ जण या दलाचे सदस्य. सागरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळण्याचा प्रमुख स्रोत.
  • सागर कवच, सागर सजग या सारखी मॉक ड्रिल; तटरक्षक दल, सागरी पोलिसांचा समावेश
  • संवेदनाक्षम अशा ९१ लॅण्डिंग पॉइंटवर फिशिंग वॉर्डन्सची नियुक्ती
  • सीमा शुल्क, नौदल, तटरक्षक दल, महासंचालक नौकानयन, मस्त्य विभाग, मेरिटाइम मंडळाकडून सागरी गस्त