उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवाचे पूर्वज जेव्हा झाडावरून जमिनीवर आणि गुहांमध्ये वास्तव्यास आले, तेव्हा त्यांचे जीवन चहुबाजूंनी धोक्यांनी भरलेले होते. अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव खूपच अशक्त आणि असहाय होता. शरीराचा आकार, ताकद, धावण्याची किंवा पाण्यात पोहण्याची क्षमता अशा सर्वच बाबतींत तो अन्य प्राण्यांच्या मानाने बराच कमकुवत होता. त्याला वाघ-सिंहासारख्या नख्या किंवा सुळे नव्हते, चित्ता किंवा हरणासारखी चपळाई नव्हती, मगर-सुसरीसारखी पोहण्याची क्षमता नव्हती, हत्ती-गेंडय़ासारख्या महाकाय आणि बलवान प्राण्यांच्या तुलनेत त्याची क्षमता अगदीच तोकडी होती. गरुड-ससाण्यासारखी तो हवेत भरारी मारू शकत नव्हता आणि त्यांच्यासारखी धारदार चोचही नव्हती. तसेच साप-विंचू यासारखी त्याच्याकडे विषारी हत्यारेही नव्हती आणि गवा-बैल यांच्यासारखी शिंगेही नव्हती. मात्र या सर्व त्रुटींवर मात करून तो केवळ जगलाच नाही तर पृथ्वीवर आणि आता त्याही पलीकडे अवकाशात त्याने आपले प्रभुत्व स्थापन केले. या प्रवासात त्याच्या कामी आला तो त्याचा विकसित मेंदू, हाताच्या चारी बोटांपासून वेगळा असलेला अंगठा आणि त्यांच्या मदतीने औजारे किंवा हत्यारे बनवण्याचे कसब. त्यानेच माणसाला तारले. त्या शस्त्रास्त्रांच्या विकासाचीच ही कहाणी आहे.

ज्यावेळी माणसाने जीव वाचवण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी एखाद्या प्राण्यावर दगड, काठय़ा आदींनी हल्ला केला असेल, तेव्हा ती त्याची पहिली शस्त्रे असतील. जेव्हा ती शस्त्रे एकमेकांविरुद्ध वापरली असतील तेव्हा युद्धाचा जन्म झाला असेल. पुढे त्याने त्याच्या बुद्धिकौशल्यावर आणि कल्पकतेच्या जोरावर त्यात अनेक बदल आणि सुधारणा केल्या. अश्मयुगात त्याला दगडाला आकार देण्याचे कसब साधले आणि त्यातून त्याने धारदार आणि अणुकुचीदार दगड घडवले. त्याने शिकार आणि स्वसंरक्षण करण्यास मदत झाली. सुरुवातीची दगडाची हत्यारे बहुतांशी गारगोटीच्या दगडापासून (फ्लिंटस्टोन) बनवलेली आढळतात. त्यानंतर हेच धार केलेले दगड वेली, मुळ्या, झाडांच्या साली आणि जनावरांची आतडी आदी वस्तूंनी लहान काठीला बांधून सुरुवातीची कुऱ्हाड अस्तित्वात आली. मृत जनावरांची हाडे, शिंगे, काठय़ा यांना धार आणि टोक करून सुरुवातीचे भाले आणि चाकूसारखी हत्यारे बनवली. यांच्या वापरामुळे त्याला शिकार करणे सोपे झाले. त्यातून अन्न मिळण्याची शक्यता आणि परिणामी जिवंत राहण्याची टक्केवारी वाढली. पुढे गारगोटीच्या घर्षणातून आणि कापसापासून अग्नी प्रदीपित करण्याचे तंत्र गवसले आणि अन्न शिजवून पचवण्याची ताकद वाढली. आगीचा शस्त्र म्हणूनही वापर करता आला. अद्याप माणूस नद्यांच्या किनाऱ्याने वस्त्या करून राहू लागला नव्हता. नागर संस्कृतीचा उदय झाला नव्हता. तेव्हा टोळ्यांनी राहणाऱ्या या माणसासाठी शिकारीतून अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करणारी ही शस्त्रे एक महत्त्वाचा ‘फोर्स मल्टिप्लायर’ होती.

chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

जगभरातील विविध भागांतील टोळ्यांनी तेथील साधनसामग्रीच्या उपलब्धतेवर आणि आपापल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर या मूलभूत शस्त्रांत काही बदल घडवले. त्यातून या मूळ शस्त्रांची परिणामकारकता वाढली. बुमरँग, बोला (तीन दोरांना एकत्र करून पुढे बांधलेले दगड), भाला फेकण्यासाठी वापरली जाणारी ‘अ‍ॅटलाटल’ नावाची काठी (स्पिअर थ्रोअर), धनुष्यबाण आदी काही सुधारित शस्त्रे होती. त्यांनीच पुढील अधिक प्रगत आणि संहारक शस्त्रास्त्रांचा मार्ग प्रशस्त केला.

sachin.diwan@expressindia.com