शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने ३३,००० रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे. शिवसेना भवनासमोरच ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.

रुद्राक्षांसोबत बाळासाहेब ठाकरेंचं वेगळंच नातं होतं. त्यामुळेच त्यांची प्रतिमा रुद्राक्षांनी साकारण्याचे मी ठरवले असे ही प्रतिमा साकारणारा कलाकार चेतन राऊत याने म्हटले आहे. ८ बाय ८ फूट या आकारातील ही प्रतिमा असून तब्बल ३३,००० रुद्राक्षांचा वापर करुन ती साकारण्यात आली आहे. याद्वारे जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्नही आपण केला असल्याचेही राऊतने सांगितले. चेतन राऊत हा जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी असून त्याने आपल्या दहा सहकार्यांच्या मदतीने ही प्रतिमा साकारली आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. शिवाजी पार्कजवळ असलेल्या महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाणार आहे. मोक्याच्या ११,५०० चौरस मीटर एवढ्या जागेत हे स्मारक होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून स्मारकासाठी गेल्या वर्षी ही जागा बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टकडे हस्तांतरीत करण्यात आली होती.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक केशव सिताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई यांच्या पोटी झाला होता. ते एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. १९६६ मध्ये त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना पक्षाची स्थापना केली. सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे ते संस्थापक-संपादक होते. दरम्यान, १७ नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले.