मेट्रो ३ च्या प्रकल्पावरुन अखेर अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रणजीतसिंग देओल यांना आणण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंग हे आता अश्विनी भिडे यांच्या जागी मेट्रो ३ चा कार्यभार पाहतील. अश्विनी भिडे यांच्या हातून एमएमआरसीएलचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांना अद्याप कोणतीही पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरे येथील प्रस्तावित मेट्रो ३ च्या कारशेडचं अश्विनी भिडे यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आरे कारशेडला विरोध दर्शवला आहे. दरम्यान या कारशेडचं समर्थन करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे.

अश्विनी भिडे यांच्यासोबत इतर २० अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांना एड्स नियंत्रण प्रकल्पावरुन त्यांना नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

राज्यातील ठाकरे सरकारने सनदी अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांना मेट्रो ३ च्या संचालक पदावरुन हटवलं आहे. भिडे यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यांना कार्यकाळ वाढवून देण्यात आला नाही. आता अश्विनी भिडे यांना ठाकरे सरकार कोणती जबाबदारी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते. तरीही अश्विनी भिडे यांना बढती देण्यात आली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आज अखेर त्यांना तातडीने पदावरुन हटवण्यात आलं आहे. मात्र त्यांना कोणतीही पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwini bhide removed from mmrcl metro 3 md post scj
First published on: 21-01-2020 at 20:52 IST