मुंबईमध्ये अनेक भागांत अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर येत असून पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील सहायक आयुक्त आपली जबाबदारी झटकू पाहात आहेत. ही जबाबदारी पदनिर्देशित अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली असली तरी यापुढे अनधिकृत बांधकामांसाठी साहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल. जबाबदारी झटकणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी शनिवारी दिला.
मुंबईतील कामांचा आढावा घेण्यासाठी मेहता यांनी शनिवारी विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित केली होती. देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.
जबाबदारी निश्चित
अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयातील इमारत बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.