संदीप आचार्य, मुंबई

महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर कोणालाही अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत ७२ तास मोफत औषधोपचार किंवा ३० हजार रुपये देण्याची घोषणा गाजावाजा करत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली होती. त्यास आता दोन वर्षे उलटली तरीही अद्यापही योजना अस्तित्वात आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या योजनेला मंजुरी मिळाली नसल्याने एका पैशाचीही तरतूद या योजनेसाठी केली जाणार नाही, असे वित्त विभागाने आरोग्य खात्याला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी २०१५ च्या अखेरीस बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यताही घेण्यात आली. गेल्या वर्षी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातही या योजनेचा उल्लेख केला. मात्र आजपर्यंत आरोग्य विभाग या योजनेची अंमलबजावणी करू शकलेला नाही. राज्यात शिवसेना सत्तेमध्ये सामील झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या अनेक योजनांच्या घोषणा शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्या. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही रस्त्यावरील अपघातांची मोठी संख्या लक्षात घेऊन जखमी रुग्णांना तात्काळ मदत मिळावी यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील रस्त्यावर रोज शेकडो अपघात होतात व यातील अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

यापूर्वी आरोग्य विभागाने महामार्गालगत ट्रॉमा केअर रुग्णालये सुरू करण्याची अशीच एक घोषणा केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील रस्त्यावरील अपघातात कोणत्याही राज्याचा नागरिक जरी जखमी झाला तरी त्यालाही बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत पहिले ७२ तास मोफत उपचार अथवा तीस हजार रुपयांची मदत विमा योजनेच्या माध्यमातून देण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती; तथापि या योजनेला व्यवहार्यतेच्या कसोटीवर वित्त विभागाने मान्यता न दिल्यामुळे आरोग्य विभागापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने या योजनेसाठी ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता.

पहिल्या टप्प्यात योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित केली होती. मात्र या योजनेला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नसल्याचे सांगत वित्त विभागाने एक रुपयाचीही तरतूद अर्थसंकल्पात केली नाही. आरोग्य विभागाच्या या पोकळ प्रस्तावामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्येही नाराजी खदखदत आहे.

या योजनेसाठी आरोग्य विभागाने ठोस पाठपुरवा करून दोन वर्षांपूर्वीच ही योजना लागू केली असती तर महाराष्ट्रातील अपघातांमध्ये गंभीर जखमी होणाऱ्या शेकडो रुग्णांना वेळेवर मदत मिळून त्यांचे जीव वाचले असते, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना कोणत्याही परिस्थितीत अमलात येईल. सध्या आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची निविदा प्रक्रिया सुरू असून त्यापाठोपाठ अपघात विमा योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

– दीपक सावंत, आरोग्यमंत्री