‘बालभारती’कडून स्वामित्व हक्काचा मुद्दा; प्रकाशकांमध्ये नाराजी

एकीकडे विद्यार्थ्यांची ‘गाईड्स’ घेऊन घोकंपट्टी करण्याची प्रवृत्ती मोडीत काढण्याची भाषा करताना प्रत्यक्षात पाठय़पुस्तकांवरील मार्गदर्शक पुस्तके, गाईड्स यांना शिक्षण विभागानेच अधिकृत स्वरूप बहाल केले आहे. पाठय़पुस्तकांवर आधारीत मार्गदर्शक पुस्तके, प्रश्नावली प्रकाशित करण्यासाठी परवान्यांची विक्री बालभारतीकडून सोमवारपासून करण्यात येणार असून त्यामुळे गाईड्स वापराला आता शिक्षण विभागाचीच मान्यता मिळाल्यासारखे आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाची तोशीस पडू न देता पत्र-लेखन, निबंधांपासून ते क्षेत्र अभ्यासाच्या बेतीव आणि एकसुरी उत्तरे पुरविणाऱ्या गाईड्सवर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा भर असतो. गेल्या काही दशकांमध्ये अशी गाइड्स पुरविणाऱ्या प्रकाशन संस्था फोफावल्या आहेत.या प्रकाराला आळा घालण्याची भाषणे करताना या संस्थांना आता अधिकृत परवाने देण्याचे धोरण शिक्षण विभागाने लागू केले आहे. त्यामुळे पाठांतरावर आधारित परीक्षेचे मूळ असणारी ही पाठय़पुस्तकांवर आधारित मार्गदर्शक पुस्तके किंवा गाईड्स आता शिक्षण विभागाच्याच सहाय्याने राजरोसपणे विकली जाणार आहेत.

स्वामित्व हक्काची बाब..

राज्यमंडळाच्या शाळांसाठीची पाठय़पुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतात. त्यावर आधारित प्रश्नावली, मार्गदर्शक पुस्तके अनेक खासगी प्रकाशक तयार करतात. आतापर्यंत बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित मजकूर कुणीही तयार करू शकत असे. असा मजकूर प्रकाशित करताना फक्त बालभारतीला आवश्यक तेथे श्रेय देणे आणि बालभारतीच्या मूळ मजकुरात काही बदल न करणे अपेक्षित होते. मात्र आता बालभारतीने आपल्या पुस्तकांसाठी स्वमित्व हक्क घेतले आहेत.

आता काय होईल?

बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित कोणतीही पुस्तके किंवा मजकूर प्रकाशित करण्यापूर्वी आता प्रकाशकांना बालभारतीची परवानगी घेऊन लाखो रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. परवानगी न घेता मार्गदर्शक पुस्तके प्रकाशित करणाऱ्या संस्थांविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे बालभारतीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात ‘बालभारती परवानाधारक गाईड्स’ किंवा ‘बालभारती मान्यताप्राप्त’ गाईड्स उपलब्ध होतील. तर परवाना नसलेल्या प्रकाशकांना आपली गाईड्स विक्री बंद करावी लागेल.

असे आहे धोरण..

बालभारतीने जाहीर केलेल्या धोरणानुसार पुस्तके छापील स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी प्रत्येक इयत्तेच्या, प्रत्येक माध्यमाच्या प्रत्येक पुस्तकासाठी दरवर्षी ६३ हजार रुपये शुल्क प्रकाशकांना द्यावे लागेल. प्रश्नावली प्रकाशित करण्यासाठी हे शुल्क दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी ३१ हजार रुपये असेल तर डिजिटल साहित्यासाठी हे मूल्य दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी ३५ हजार रुपये असेल.

 प्रकाशकांनी दरवर्षी परवान्याचे नुतनीकरण करणे

  • वार्षिक उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रकाशकांना शुल्क भरावे लागणार नाही
  • बालभारतीने पुस्तक प्रकाशित केल्यापासून महिन्याच्या आत परवाना घेतलेल्या प्रकाशकांना साहित्य प्रकाशित करावे लागेल.
  • परवानगीशिवाय पाठय़पुस्तकांवर आधारित साहित्य निर्मिती करणाऱ्या प्रकाशकांवर कारवाई

प्रकाशकांमध्ये अस्वस्थता

बालभारतीने हे धोरण शुक्रवारी अंतिम स्वरूपात जाहीर केले. सोमवारपासून परवाने देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. हे धोरण तयार करण्यात येत असताना त्यामध्ये प्रकाशकांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी प्रकाशकांनी केली होती. मात्र शासनाने प्रकाशकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे. यासाठी आकारण्यात आलेले शुल्कही  जास्त असून ठराविक मोठय़ा प्रकाशकांचे हित राखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचाआरोपही  करण्यात येत आहे. फक्त दहावीची मराठी माध्यमाची पुस्तके गृहित धरली तरीही भाषा, गाणित , विज्ञान, सामाजशास्त्र या विषयांची मिळून १२ पुस्तके होतात. त्यानुसार एका इयत्तेच्या फक्त एका माध्यमातील पुस्तकांसाठी एका वर्षांसाठी प्रकाशकांना ७ लाख ५६ हजार रुपये भरावे लागतील. अशी आठ माध्यमे आणि दहा इयत्ता असा हिशोब करता प्रकाशकांना दरवर्षी कोटय़वधी रुपये भरावे लागू शकतील.

पाठय़पुस्तके आणि गाईड्स

कोणत्या वयाला कोणत्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, त्या कशा कराव्यात, काय टाळावे आणि काय आवर्जून शिकवावे याचा आराखडा म्हणजे अभ्यासक्रम आराखडा म्हणता येईल. पाठय़पुस्तकातील धडे पाठ होण्यापेक्षा संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते असे पूर्वापार सार्वत्रिक मत. मात्र अभ्यासक्रमातील घटक समजावून सांगण्यासाठी काही उदाहरणे, आवश्यक साधने असावित या उद्देशाने पाठय़पुस्तकांची निर्मिती होऊ लागली. सर्व शाळांमध्ये एक समान पाठय़पुस्तके आहेत. मात्र आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंडळाकडून अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात येत होता आणि त्या आधारे प्रकाशक स्वतंत्रपणे पुस्तकांची निर्मिती करत होते. पाठय़पुस्तके आल्यानंतर परीक्षा आणि प्रश्नपत्रिकांचे स्वरूप हे पुस्तकांतील घटकांवर आधारित असे झाले. त्यामुळे परीक्षेची तयारी सोपी व्हावी या उद्देशाने पाठय़पुस्तकांतील घटकांची तयार उत्तरे सांगणारी मार्गदर्शक पुस्तके (गाईड्स) तयार होऊ लागली.