तब्बल २५ रुपयांची वाढ; नववर्ष स्वागताच्या उधाणावर परिणाम

उत्पादन शुल्कातील वाढीनंतर कमाल विक्री किंमत (एमआरपी) वाढवण्याची बीअर उत्पादक कंपन्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याने राज्यभरात बीअरच्या बाटलीची किंमत २० ते २५ रुपयांनी वाढणार आहे. ऐन नाताळाच्या आठवडय़ात आणि ३१ डिसेंबरच्या सोहळ्याच्या तोंडावर होणाऱ्या या दरवाढीमुळे आठवडा अखेरीस होणारी बीअर विक्री मंदावणार असल्याचा अंदाज मद्यविक्रेता संघटनेने केला आहे.

उत्पादनशुल्कात वाढ झाल्याने नफ्यावर परिणाम होत असून बीअरच्या ‘एमआरपी’त वाढ करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बीअर उत्पादक कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात केली होती. पण त्यावर तातडीने निर्णय झाला नाही. त्यामुळे बीअर कंपन्यांनी पुरवठा कमी केला. राज्यात दरमहा सरासरी बीअरच्या दोन कोटी चार लाख बाटल्यांची विक्री होते. यंदा पुरवठाच ३६ लाख बाटल्यांपर्यंत खाली आला होता. आता राज्य सरकारने बीअरच्या एमआरपीमध्ये वाढ करण्याची मागणी मान्य करत त्याची अधिसूचना काढली आहे.  सध्या माइल्ड बीअरची किंमत उत्पादन खर्चाच्या साडेतीन पट आकारता येते. आता ते प्रमाण ३.७५ पट होईल. तर स्ट्रॉंग बीअरची किंमत उत्पादन खर्चाच्या ४.२५ पटपर्यंत आकारता येते. ते प्रमाण आता ४.६ पट असे करण्यात आले आहे.

बीअरच्या किंमतीत वाढ करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ती अधिसूचना २३ डिसेंबरपासून लागू झाली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलावर काय परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही, असे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

आर्थिक अस्थिरतेमुळे या वर्षी बीअरच्या बाजारपेठेत एकंदरच कमी उलाढाल आहे. दिवाळीवरही मंदीचे सावट होते. ख्रिसमसलाही तेच झाले. एरवी नाताळ ते ३१ डिसेंबरच्या काळात मद्याची मागणी वाढते. बीअरचा विचार करता सरासरी दोन कोटी चार लाख बाटल्यांची विक्री डिसेंबरमध्ये दोन कोटी ६४ लाख बाटल्यांपर्यंत जाते. पण यंदा बीअर महाग झाल्याने त्याचा परिणाम ३१ डिसेंबरसाठी होणाऱ्या (पान १० वर) (पान १ वरून) विक्रीवर होईल, असे महाराष्ट्र वाइन र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप ग्यानानी यांनी नमूद केले. मुळात देशात मद्यावर सर्वाधिक कर महाराष्ट्रात आहे. तो निदान इतर राज्यांप्रमाणे असायला हवा, असेही ते म्हणाले.

राज्य सरकार-बीअर उत्पादक कंपन्यांमधील दराच्या वादामुळे पुरवठा कमी झाला होता. आता किंमत वाढवण्याची बीअर कंपन्यांची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे जी दरवाढ होईल, ती आम्ही जशीच्या तशी ग्राहकांवर टाकू. आम्ही त्यात आणखी वाढ करणार नाही, असे आहार या हॉटेल चालकांच्या संघटनेचे सदस्य व माजी अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले.

दरातला फरक

उत्पादन शुल्कातील वाढीमुळे गेला दीड महिना बीअरचा पुरवठा खूपच कमी झाला होता. आता बीअरच्या एमआरपीत वाढ करण्याची परवानगी राज्य सरकारने दिल्याने बीअर कंपन्या हळूहळू तो पूर्ववत करतील. ऐन ३१ डिसेंबरच्या तोंडावर बीअर महाग झाली आहे. सध्या माइल्ड बीअरची बाटली सुमारे १३५ रुपयांना होती. आता तो दर १५५ ते १६० रुपयांपर्यंत जाईल. तर स्ट्रॉंग बीअरची १४० रुपयांची बाटली आता १६० ते १७० रुपयांना मिळेल, असे महाराष्ट्र वाईन र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप ग्यानानी यांनी सांगितले.