* अॅडलॅब्जकडून बेस्टकडे प्रस्ताव
* मुंबईहून वातानुकूलित व साध्या गाडय़ांची मागणी
* बेस्टचा सकारात्मक पवित्रा

तोटय़ात जाणाऱ्या परिवहन सेवेला फायद्यात आणण्यासाठी बेस्ट प्रशासन जंग जंग पछाडत असून आता ‘अॅडलॅब्ज’च्या रूपाने बेस्ट प्रशासनाला मोठा आधार मिळाला आहे. खोपोलीजवळ असलेल्या अॅडलॅब्जच्या ‘अॅडलॅब इमॅजिका’ या मनोरंजन उद्यानातील कर्मचारी आणि तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टच्या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याबाबतचा प्रस्ताव ‘अॅडलॅब्ज’ने बेस्ट प्रशासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर बेस्ट प्रशासन सकारात्मक विचार करत असून याबाबतचा निर्णय लवकरात लवकर होईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
बेस्टचा परिवहन विभाग सातत्याने तोटय़ात जात आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांत बेस्टची प्रवासी संख्या ४१ लाख प्रवाशांवरून २८ लाखांवर घसरली आहे. यात भर म्हणून विद्युत विभागाच्या ग्राहकांकडून वसूल करण्यात येणारा परिवहन सेवा अधिभार आता २०१६पासून वसूल करणे शक्य नाही. त्यामुळे बेस्टच्या परिवहन विभागाची आर्थिक स्थिती आणखीनच खालावणार आहे.
ही स्थिती सुधारण्यासाठी महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी विविध उपाय हाती घेतले आहेत. यात विद्यार्थ्यांमार्फत प्रवाशांना आवाहन करणे, बेस्टच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिकांचा प्रयत्न, प्रवासी-अधिकारी संवाद असे विविध उपाय राबवण्यात येत आहेत.
आता अॅडलॅब्ज या खासगी कंपनीने बेस्टकडे भाडेतत्त्वावर गाडय़ा देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. ‘अॅडलॅब इमॅजिका’ या अॅडलॅब्जच्या खोपोली येथील मनोरंजन उद्यानातील कर्मचारी आणि तेथे जाण्यास इच्छुक असलेल्या प्रवासी यांच्यासाठी या बसगाडय़ा वापरण्यात येणार आहेत. यासाठी अॅडलॅब्जला काही वातानुकूलित आणि काही साध्या गाडय़ा हव्या आहेत. दर दिवशी या गाडय़ा मुंबईतील बोरिवली, दादर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी ठिकाणांहून ‘अॅडलॅब इमॅजिका’ येथून निघतील. या प्रस्तावामुळे बेस्टच्या आगारांत उभ्या असलेल्या अनेक गाडय़ा रस्त्यांवर येतील आणि त्यामुळे प्रशासनाला महसूल मिळेल, असे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार चालू असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.