कृती समितीच्या बंद हाकेकडे कर्मचाऱ्यांची पाठ; १२०० बसगाडय़ा रस्त्यावर

मुंबई : बेस्ट कर्मचारी आणि कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि त्यासंबंधित विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याची हाक बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिली होती. मात्र, त्याकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्य बजावले. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांत नेहमीप्रमाणे बसगाडय़ा धावल्या. संघटनेच्या मागणीला पाठिंबा आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा देणेही गरजेचे असल्याचे मत चालक-वाहकांनी व्यक्त केले.

डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पालिका आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाकडून बसगाडय़ा चालविण्यात येतात. सोमवारपासून कामगार संघटनेने बंदची हाक दिल्याने बेस्ट सेवा सुरळीत राहील की नाही, याबाबत शंका होती. कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी प्रत्येक आगाराबाहेर आंदोलनाचे फलकही लावण्यात आले होते. परंतु, अत्यावश्यक सेवेसाठी नेहमीप्रमाणे आगारातून बस बाहेर पडल्या आणि मुंबई ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वसई, विरार, पालघपर्यंत बससेवा सुरळीत राहिली.

दरदिवशी अत्यावश्यक सेवेत साधारण दीड हजार बसगाडय़ा धावतात. सोमवारी सकाळी ८ वाजता १२०० बस निघाल्या. या वेळी १,२१३ वाहक आणि १,३३१ चालक याशिवाय वाहतूक निरीक्षक आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते. सकाळी १० पर्यंत १ हजार ५४२ बस धावल्या. या वेळी १,५०० वाहक आणि १,६४२ चालकांनी कर्तव्य बजावले. दिवसभर बस सेवा सुरू राहिल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावरही कार्यालयात वेळेत पोचल्याचे समाधान दिसत होते.

प्रमुख मागण्या

’ करोनाच्या लढय़ातील कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण

’ स्वतंत्र कोविड रुग्णालय

’ प्रत्येक कामगाराची करोनाशी संबंधित लक्षणांची दैनंदिन पातळीवर चाचणी करणे.

’ करोनाबाधित मात्र करोना लक्षणे नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अलगीकरण कक्ष

काही कर्मचाऱ्यांनी घरी राहणे पसंत केले. त्यामुळे सर्वच बस रस्त्यावर धावल्या, असे म्हणता येणार नाही. आमची मागणी कायम राहील. ज्यांना घरी राहा, सुरक्षित राहा या शासनाच्या सूचनेचा अवलंब करायचा आहे ते यापुढेही करतील.

-शशांक राव, नेते, बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती

गोराई ते माहीम अशा बेस्ट सेवेत कार्यरत राहिलो. संघटनेची मागणी योग्य आहे आणि त्याला पाठिंबाही आहे. पण, सध्याची स्थिती मदतीचा हात देण्याची आहे. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवून कामावर उपस्थित राहिलो.

-नोव्हल कार्वल, बेस्ट वाहक