शिवसेनेशी युती तोडून ‘शत प्रतिशत भाजप’चा नारा देत विधानसभा निवडणूक लढवावी आणि स्वबळावर सत्ता मिळवावी, असा जोरदार आग्रह भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी राज्य परिषदेत गुरुवारी धरला. शिवसेनेकडून कायम अपमानित होऊन दुय्यम वागणूक स्वीकारण्यापेक्षा आपल्या ताकदीवर सरकार आणि भाजपचा मुख्यमंत्री राज्यात व्हावा, अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त करताच मंडपात टाळ्यांचा उत्स्फूर्त गजर झाला. तेव्हा ‘बऱ्यावाईट दिवसांमध्ये विचारांवर आधारित असलेली मित्रांची साथ एका दिवसात तोडता येणार नाही,’ असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र या भावना लक्षात घेऊन भाजपचा सन्मान राखला जाईल, यावर कटाक्ष असेल. त्यानुसार केंद्रीय नेतृत्व आणि सुकाणू समिती योग्य निर्णय घेईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडासंकुलात भाजपची राज्य परिषद झाली. त्या वेळी माजी आमदार मधु चव्हाण यांनी युतीबाबतची खदखद व्यक्त केली. ‘भाजपचा काय बोन्साय करायचा आहे का, असा सवाल करीत ‘राष्ट्र जिंकले, आता महाराष्ट्रजिंकू’ या व्यासपीठावरील घोषणेचा दाखला दिला. तेव्हा सभागृहात जोरदार प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेला आपण मोठा भाऊ म्हणून सन्मान दिला, पण त्यांच्याकडून कायमच भाजपच्या खच्चीकरणाचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत निवडून येऊनही त्याची जाण न ठेवता व उल्लेख न करता हे यश आपलेच आहे, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे आता शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देत भाजपने सर्वच्या सर्व जागाजिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून विधानसभेच्या रणमैदानात उतरावे. मुख्यमंत्री भाजपचाच असला पाहिजे, असे काही नेत्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘‘भाजपची ताकद निश्चितपणे वाढली असून जागाजिंकण्याचे प्रमाणही खूपच अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत मतांमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. नेते व पदाधिकाऱ्यांच्या भावना महायुतीच्या बैठकीत मांडल्या जातील. त्यानुसारच जागावाटपाची बोलणी होतील.’’
लोकसभेत घवघवीत यश मिळाल्याने भाजपला किमान ५० टक्क्यांहून अधिक जागांची अपेक्षा असून शिवसेना त्यासाठी तयार नाही. त्यामुळे गेली २५ वर्षे असलेली शिवसेनेबरोबरची युती तोडावी, अशी भावना व्यक्त होत आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सर्व २८८ जागांवर बूथनिहाय तयारी  करावी, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी केली. सुमारे १५० संघटक पहिल्या टप्प्यात कार्यरत राहतील व त्यांना एक-दोन मतदारसंघांची जबाबदारी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

युती गेल्या २५ वर्षांची आहे. सुख-दु:खात नेहमीच दोघे एकत्र राहिले. अशा वेळी ती एका दिवसात तोडता येणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावनेचा सन्मान राखला जाईल आणि नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल.
देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्रात शिवशाही आणण्याचे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करायचे आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच निर्णय घेईल.
नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक मंत्री