१२ लाख कुटुंबांची सोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची साद घातल्यानंतर महापालिकेने मुंबई ‘हागणदारीमुक्त’ करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, आता पालिकेने झोपडीमध्येच शौचालय बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी झोपडीमध्ये पाणी आणि पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. तसेच यासाठी शक्य असल्यास मलवाहिन्यांचे जाळेही उभारण्याची योजना आहे. त्यामुळे, झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे १२ लाख कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होऊ शकेल. तसेच घाणीपासून रस्त्यांना मुक्ती मिळून आरोग्याचे प्रश्नही निकाली निघू शकतील.
पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर संपूर्ण भारतात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. पालिकेनेही मुंबई आणि आपल्या सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमेचा कित्ता गिरविला. आता पालिकेने मुंबईतील बकाल झोपडपट्टय़ांकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत सुमारे ७४० अधिकृत-अनधिकृत झोपडपट्टय़ा असून, त्यात ६० लाख रहिवासी आहेत. आंतरराष्ट्रीय शहरांच्या यादीत मुंबईला मानाचे स्थान असले, तरी आजही या शहरात ८६ ठिकाणी उघडय़ावरच प्रात:र्विधी उरकले जात असून, त्याची साफसफाई पालिकेच्या सफाई कामगारांनाच करावी लागते. तसेच या घाणीमुळे आसपासच्या वस्त्यांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
अनेक झोपडपट्टय़ांमध्ये पालिकेने सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. मात्र या शौचालयांची योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याने त्यांची दैनावस्था झाली आहे. अशी सार्वजनिक शौचालये उभारण्यापेक्षा ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत पाणी आणि जागा उपलब्ध असलेल्या झोपडीमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याचा फायदा झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास असलेल्या १२ लाख कुटुंबांना होईल, असा पालिकेला विश्वास आहे.
झोपडीमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी देतानाच शक्य असल्यास मलवाहिन्यांचे जाळेही उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. एक मीटर मलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च अपेक्षित असून हा खर्च पालिका स्वत: करणार आहे. ज्या ठिकाणी मलवाहिनीचे जाळे उभे करणे शक्य होणार नाही, तेथे शौचालयाच्या खाली जमिनीत सेफ्टी टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे. झोपडीमध्ये शौचालय बांधण्यास झोपडपट्टीवासीयांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यास ही मदत देण्यात येणार आहे.
आरोग्याचे प्रश्न सुटतील
सध्या झोपडपट्टय़ांमधून लगतच्या नद्या आणि नाल्यांमध्ये सर्रास सांडपाणी-मलजल सोडले जाते. वारंवार स्वच्छता करूनही नदी-नाले अस्वच्छ होतात. झोपडीमध्ये शौचालये बांधल्यानंतर अनेक प्रश्न सुटू शकतील असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रकाश पाटील यांनी सांगितले.
नवी उदंचन केंद्रे लागणार
’मुंबईत सुमारे १,५०० कि.मी. लांबीच्या मलवाहिन्यांचे जाळे असून, कुलाबा, लव्हग्रोव्ह, वांद्रे, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप येथील मलजलावर प्रक्रिया करून ते समुद्र अथवा खाडीत सोडले जाते.
’आता झोपडीमध्ये शौचालय बांधल्यानंतर मलवाहिन्यांचे जाळे विस्तृत आणि सक्षम करावे लागणार आहे. तसेच उदंचन केंद्रातील मलजलावरील प्रक्रियेची क्षमताही वाढवावी लागणार आहे.
’ते शक्य न झाल्यास काही ठिकाणी नवी उदंचन केंद्रे उभारावी लागणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.