26 September 2020

News Flash

करवाढ नाही, पण सेवाशुल्कांचे संकेत

मुंबई महापालिकेचा ६.६० कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महापालिकेचा ६.६० कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प

एकीकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन शुल्कात घसरण होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुंबईकरांवर कोणतीही करवाढ न लादणारा अर्थसंकल्प पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीला सोमवारी सादर केला.

२०१९-२० या आर्थिक वर्षांचा आणि ६.६० कोटी रुपये शिलकीचा ३० हजार ६९२ कोटी ५९ लाख रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी केलेल्या तरतुदी लक्षात घेता चालू वर्षांच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पात १२.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र भविष्यात सुविधांसाठी सेवा आकार आणि प्रवेश शुल्क लागू करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी अर्थसंकल्पात केले आहे. त्यामुळे मुंबईमधील मोठय़ा उद्यानांमध्ये प्रवेश शुल्क  लागू होण्याची आणि परवाना शुल्कांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईकरांच्या सुविधेसाठी पालिकेने मुंबई सागरी किनारा मार्ग, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, मलनि:स्सारण प्रकल्प, सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका, देवनार कचराभूमीत उर्जा निर्मिती प्रकल्प, मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे, २२ हजार शौचकूपांचे बांधकाम, गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पासह विविध नागरी कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर आणि विकास नियोजन शुल्क वसुलीत आगामी वर्षांत घट होण्याची भीती अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आली आहे. त्याचमुळे भविष्यात पालिका सुविधांसाठी सेवा आकार आणि प्रवेश शुल्क लागू करण्याचे संकेत अर्थसंकल्पात आहेत. नेमक्या कोणत्या सुविधांवर सेवा आकार आकारणार आणि कशासाठी प्रवेश शुल्क लागू करणार याचा उल्लेख मात्र केलेला नाही.

अर्थसंकल्पात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपये, महापौरांच्या नव्या निवासस्थानाच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करुन शिवसेनेला, तर मुंबईतील एलईडी दिवे बसविण्याच्या संकल्पपूर्तीसाठी ५० कोटीची तरतूद करून भाजपला खूष करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापि, शिवसेना आणि भाजपने पालिका निवडणुकीदरम्यान मालमत्ता करमाफी आणि सवलतीबाबत दिलेल्या आश्वासनपूर्तीचा अर्थसंकल्पात उल्लेखही नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 1:37 am

Web Title: bmc budget 2019
Next Stories
1 BMC budget 2019-20 | मुंबईकरांवर सुविधा शुल्काचा भार
2 BMC budget 2019-20 | शालेय साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात
3 BMC budget 2019-20 | उपनगरीय रुग्णालयांचा विकास
Just Now!
X