मलेरिया आणि डेंग्यूचे विषाणू पसरवणाऱ्या डासांची निर्मिती रोखण्यासाठी साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याची वारंवार सूचना देऊनही त्यांची पैदास होत असलेल्या ३१४ ठिकाणच्या मालकांकडून पालिकेने १५ लाख रुपयांचा दंड वसूल केला.
कीटकनाशक विभागाने गेल्या सहा महिन्यांत तब्बल १४ लाख ठिकाणांची पाहणी केली. त्यातील १९७९ ठिकाणी डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या तर १२५९ ठिकाणी अ‍ॅनाफिलीस या मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या सापडल्या.
याप्रकरणी १६९२ जणांना नोटीस पाठवण्यात आल्या. त्यातील ३१४ जणांवर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्यावर १५ लाख ५२ हजार ९०० रुपये दंड लावण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत मलेरियाचे २८८६ (एक मृत्यू), डेंग्यूचे १८१, स्वाइन फ्लूचे १८४२ (१८ मृत्यू) आणि लेप्टोचे २६ (१२ मृत्यू) रुग्ण आढळले.