प्रत्येक नगरसेवकाच्या विभागातील छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करतानाच प्रशासनाने कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यामुळे खूश झालेल्या नगरसेवकांच्या आनंदावर पालिका आयुक्तांच्या एका परिपत्रकामुळे विरजण पडले आहे. एका कामासाठी तीन लाख रुपये खर्चमर्यादा निश्चित करून प्रत्येक विभागात केवळ १० कामे करण्याचे बंधन पालिका आयुक्त अजय मेहता यांनी परिपत्रकाद्वारे घातले आहे. अकराव्या कामासाठी अतिरिक्त आयुक्तांची परवानगी बंधनकारक केली आहे. आयुक्तांच्या या धक्क्यामुळे नाराज झालेले नगरसेवक परिपत्रक मागे घेण्याची मागणी करू लागले आहेत.
लादीकरण, शौचालयाची दुरुस्ती, गटारांची कामे अशा प्रकारची छोटी-मोठी कामे करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. एका कंत्राटदाराला दोन विभागांतील कामे करता येणार आहेत. या कामांसाठी प्रत्येक नगरसेवकाच्या विभागाकरिता तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विभागात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामासाठी तीन लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. निधी आणि कंत्राटदार उपलब्ध झाल्यामुळे नगरसेवकांनी कामांचा सपाटा लावला आहे. मात्र अजय मेहता यांनी एक परिपत्रक जारी करीत प्रत्येक विभागामध्ये केवळ १० कामे करता येतील, असे स्पष्ट केले आहे.