सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची माघार

मुंबई : करोनाबाधित रुग्णांचे अहवाल आता पालिकेसह संबंधित रुग्णालयांना कळवावेत अशी सूचना पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने माघार घेतली असली तरी रुग्णांनाही अहवाल कळविण्याबाबत मात्र सुधारित चाचणी नियमावलीत स्पष्ट केलेले नाही.

करोनाबाधित रुग्णांचे निदान झाल्यावर त्यांचे अहवाल थेट रुग्णांना किवा संबंधित रुग्णालयांना कळवू नयेत. थेट पालिकेला याची माहिती द्यावी. पालिकेकडून त्यांना कळविण्यात येतील, असे आदेश पालिकेने खासगी प्रयोगशाळांना १३ जूनला जाहीर केलेल्या चाचणी नियमावलीत दिले होते. अहवाल समजल्यानंतर रुग्ण अत्यवस्थ होतात आणि रुग्णालयात दाखल होण्यासाठी घाई करतात.

खाटांची संख्या मर्यादित असल्याने आवश्यकतेनुसार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्या वेळी पालिकेने स्पष्टीकरण दिले होते.

या निर्णयामुळे मात्र रुग्णालयांना बाधित रुग्णांबाबत वेळेत न समजल्यास उपचार देण्यास विलंब होईल. तसेच यामुळे संसर्ग प्रसार होण्याचा धोका असल्याचे नमूद करत रुग्णालयांसह विविध स्तरांमधून यावर टीका झाली. पालिकेकडे अहवाल दिल्यानंतर वेळेत संबंधितांना पोहचविले जातील का, याबाबतही अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या गेल्या. या प्रकरणाची स्वत:हून  दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना त्यांचे अहवाल जाणून घेण्याचा हक्क असून तो नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करत नियमावलीत सुधारणा करण्याचे आदेश राज्य सरकारला १९ जूनला दिले होते. दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयानेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करण्याचे आदेश पालिकेला दिले.

यानुसार पालिकेने सुधारित नियमावली काढली असून पालिकेसह संबंधित रुग्णालयांनाही बाधितांचे अहवाल प्रयोगशाळांनी पाठविण्याचे नमूद केले आहे.

रुग्णांना अहवाल २४ तासांनंतरच

बाधित रुग्णांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेकडून आता थेट पालिकेला कळविले जातात. पालिकेच्या संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाते. २४ तासांनंतर प्रयोगशाळेकडून हे अहवाल रुग्णांना पाठविले जात असल्याचे एका खासगी प्रयोगशाळेने सांगितले.