वर्षभर आधीपासूनच मुंबई महापालिकेची तयारी; पुरवठादारापासून रुग्णालयांपर्यंत प्रत्येक घटकाशी समन्वय

मुंबई : सुविधांचे केंद्रीकरण, अंमलबजावणीचे विकेंद्रीकरण आणि प्राणवायू, औषधे यांचे सुयोग्य व्यवस्थापन ही मुंबई पालिकेची कार्यशैली करोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात प्रभावी ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने हेच प्रारूप(मुंबई मॉडेल) वाखाणले आहे. प्राणवायूचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केल्यामुळेच तुटवडा भासत असतानाही मुंबईत दिल्ली किंवा अन्य राज्यांसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही.

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि करोनाच्या संसर्गाविरोधात पालिकेने कंबर कसली. मुंबईची लोकसंख्या एक कोटी ६० लाखांच्या घरात आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने १७६ रुग्णालयांमधून करोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. करोना रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या सुविधांचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळेच मुंबई महापालिकेला यश मिळाले, असे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी ‘मुंबई मॉडेल’विषयी माहिती देताना सांगितले. या वर्षी १५ मार्चपासून बाधितांची संख्या वाढली. मात्र पालिकेने वर्षभरापूर्वी कार्यान्वित केलेल्या डॅशबोर्डमुळे रुग्णालयांमधील सर्वसाधारण, प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्णशय्या, अतिदक्षता उपचार रुग्णशय्या यांची माहिती वेळोवेळी मिळत होती. त्यामुळे प्रशासनाला झटपट निर्णय घेणे शक्य झाले.

या सर्व नियोजनात कळीचा मुद्दा ठरला तो प्राणवायू व्यवस्थापनाचा. प्राणवायूच्या व्यवस्थापनाचा विचार मागील वर्षी म्हणजे मे २०२० मध्येच करण्यात आला. त्या वेळी पालिकेच्या एका रुग्णालयामध्ये प्राणवायूची कमतरता भासली होती. त्यानंतर पालिकेच्या पथकाने सर्व रुग्णालयांमध्ये भेट देऊन रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली प्राणवायू साठवण क्षमता, प्राणवायू वाहिन्यांची स्थिती, प्राणवायूपुरवठय़ाची पद्धती, पुरवठादाराचे नाव, पुरवठय़ाचा कालावधी याबाबत सर्व अभ्यास करून अहवाल तयार केला. त्याआधारे उपाय आखण्यात आले, असे वेलरासू यांनी सांगितले.

प्राणवायूचे मुंबई प्रारूपसुनिश्चित कार्यप्रणाली

मुंबईतील सर्व वैद्यकीय सेवांचा विचार करता दररोज सुमारे १५ हजार ते १७ हजार रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करावा लागतो. अतिदक्षता उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्रति मिनिट सरासरी २५ लिटर, तर प्राणवायू रुग्णशय्येवर उपचार घेत असलेल्यांना प्रति मिनिट सुमारे १० लिटर प्राणवायू पुरवावा लागतो. या गोष्टी विचारात घेऊन महापालिकेने एक कार्यप्रणाली निश्चित केली. दूरदृश्य प्रणालीद्वारे सरकारी तसेच खासगी रुग्णालयांशी संवाद साधून आपत्कालीन प्रसंगांमध्ये नेमके काय करायचे याविषयी सूचना देण्यात आल्या. सुनिश्चित कार्यप्रणालीमध्ये पुनर्उत्पादक, रुग्णालये आणि आणीबाणी प्रसंगाशी संबंधित सर्व घटकांचा समावेश करण्यात आला.

साठवणूक टाक्यांची उभारणी

प्रत्येक महानगरपालिका रुग्णालयामध्ये प्राणवायू साठवणुकीची क्षमता वाढवण्यात आली. रुग्णालयांमध्ये सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण करून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्राणवायू साठवण्यासाठी टाक्या उभारण्यात आल्या. पालिकेच्या प्राणवायू पथकाने एकूण १३ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १३ हजार लिटर, ३ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ११ हजार लिटर, आठ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ६ हजार लिटर क्षमतेच्या टाक्या उभारल्या.

संकटात समयसूचकता

द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरेसा पुरवठा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. याच निकषामध्ये एक शहर म्हणून दिल्लीला अडचणींचा सामना करावा लागला आहे. सलग तीन दिवस मुंबईनेही आणीबाणी स्थिती अनुभवली. त्या वेळी रुग्णांना कोणतीही हानी न पोहोचू देता त्यांना मोठय़ा रुग्णालयांमध्ये यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आले.

तुटवडय़ावर तातडीने उपाय

प्राणवायूच्या तुटवडय़ाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तुटवडय़ाची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्ह्य़ातील एका कंपनीतून ३० मेट्रिक टन, तर जामनगरमधून टँकरने प्राणवायूचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला. या दोन्ही ठिकाणांहून पुरवठा वेळेत उपलब्ध झाला नसता, तर मुंबईलादेखील अडचणींचा सामना करावा लागला असता. प्रभावी व्यवस्थापनामुळे ते शक्य झाले, असे वेलारसू म्हणाले.

रुग्णसंख्येत घट

मुंबईमध्ये १० एप्रिल २०२१ रोजी प्रत्यक्ष बाधित रुग्णांची एकूण प्रगतशील (क्युम्युलेटिव्ह) संख्या ही ९२ हजार ४६४ इतकी होती. त्यानंतर हळूहळू ती कमी होऊ लागली. ही संख्या १९ एप्रिल २०२१ रोजी ८६ हजार ४१०, तर २५ एप्रिल २०२१ रोजी ७५ हजार ७४० इतकी झाली. ४ मे २०२१ रोजी बाधित रुग्णांची एकत्रित संख्या ५७ हजार ३४२  इतकी होती.