दहशतवादविरोधी पथकाने पालिकेच्या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आयुक्तांनी मुख्यालयात कडेकोट बंदोबस्त करण्याचे आदेश आपल्या सुरक्षा रक्षक दलाला दिले. मात्र पालिकेमध्ये येणारे आगंतूक मोठय़ा प्रमाणावर चलनी नोटांची बंडले, विदेशी मद्याच्या बाटल्या, रिव्हॉल्वर सोबत घेऊन येत असल्याचे आढळून आले आहे. सुरक्षा रक्षकांनी या मंडळींना प्रवेशद्वारावरच रोखण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे या मंडळींना मुख्यालयात सोडणे त्यांना भाग पडत आहे.
काही दिवसांपूर्वी दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी साध्या वेशामध्ये रिव्हॉल्वर, बॉम्ब घेऊन पालिका मुख्यालयात गेले होते. मुख्यालयात प्रवेश करताना त्यांची तपासणीही झाली नाही. संपूर्ण इमारतीमध्ये फिरल्यानंतर त्यांनी थेट पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांचे दालन गाठले आणि त्यांच्या मेजावर बॉम्ब आणि रिव्हॉल्वर ठेऊन मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे संतप्त झालेल्या कुंटे यांनी सुरक्षा रक्षक दलाला कानपिचक्या देत कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले.
आयुक्तांच्या आदेशानंतर मुख्यालयात येणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच कसून तपासणी करण्यात येत आहे. काही मंडळी आपल्या बॅगांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चलनी नोटांची बंडले, तर काही जण विदेशी मद्याच्या बाटल्या घेऊन येत असल्याचे सुरक्षा रक्षकांना आढळून आले. त्यांना मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारीच सुरक्षा रक्षकांना तंबी देऊन या मंडळींना आत सोडण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची कोंडी होऊ लागली आहे. या गोष्टी  कोणासाठी आणल्या जातात, तसेच या मंडळींना आत सोडण्याचे आदेश कोण देते, याची चौकशी करावी, अशी मागणी पालिका वर्तुळात होत आहे.

अतिरिक्त आयुक्तांचा मोबाइल चोरीला
मरिन ड्राईव्ह येथे शनिवारी रात्री फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांचा महागडा मोबाइल अज्ञात इसमांनी हिसकावून दुचाकीवरुन पोबारा केला. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस लुटारुंचा शोध घेत आहेत. मलबार हिल येथे वास्तव्यास असलेले अडतानी शनिवारी रात्री ९.४० च्या सुमारास पाय मोकळे करण्यासाठी मरिन ड्राईव्ह येथे गेले होते. अडतानी पारसी जिमखान्यासमोरील मेघदुत पुलावरुन घरी परतात असताना भरधाव वेगात तेथे आलेल्या दुचाकीवरील अज्ञात इसमाने त्यांच्याकडील ३५ हजार रुपये किंमतीचा ‘सॅमसंग सॅलॅक्सी एस-३’ मोबाइल हिसकावून घेतला आणि दुचाकीवरुन गिरगावच्या दिशेने पोबारा केले. सोनसाखळी चोरांनी अचानक मोबाइल हिसकावून नेल्यामुळे अडतानी भांबावले. मात्र तात्काळ स्वत:ला सावरुन त्यांनी थेट मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. मरिन ड्राईव्ह पोलीस भुरटय़ा चोरांचा शोध घेत आहेत.
     मेघदुत पुलावर तीस सीसी टीव्ही कॅमेरे असून त्यावरील चित्रणाची पोलीस तपासणी करीत आहेत. सराईत सोनसाखळी चोरांनी ही चोरी केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.