मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरु होती. पण अखेर महापालिकेने हा पूल आमचाच असल्याचं मान्य केलं आहे.

पूल कोसळून जीवितहानी ओढवताच पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा वाद रंगला होता. महापालिका आणि रेल्वेने तातडीने या पुलाची जबाबदारी झटकून टाकली होती. या दुर्घटनेनंतर ट्विटरवरून महापालिका, सरकार आणि रेल्वेवर जोरदार ट्विपण्णी सुरू झाली होती. पण अखेर महापालिका अधिकाऱ्यांनी या पुलाची जबाबदारी स्विकारली.

स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कर्यवाही करण्यात आलेली नाही असं सुजाता सानप यांनी सांगितलं होतं.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीदेखील पुलाची जबाबदारी रेल्वेची असल्याचं सांगितल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल महापालिकेच्या अख्त्यारित येत असून आम्ही सहकार्य करत असल्याचं सांगितलं होतं. पण महापालिका अधिकाऱ्यांना रात्री उशिरा या पुलाची जबाबदारी महापालिकेची होती स्पष्ट केल्याने संभ्रम दूर झाला आहे.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.

 

चौकशीचा आदेश

मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आली होती. त्या तपासणीत हा पूल चांगला असल्याचा आणि किरकोळ डागडुजीची शिफारस करणारा अहवाल देण्यात आला होता. तरीही हा पूल पडल्याने दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर संरचनात्मक तपासणीत कसूर झाली असल्यास दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

वाहतूक आजही रखडणार?

दुर्घटना स्थळाची शुक्रवारी पाहणी करून दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू होईपर्यंत सीएसएमटीकडे येणारी आणि तेथून उपनगरांकडे जाणारी वाहतूक मेट्रो चौकातून वळविण्यात आली आहे, असे सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितले.