कचरा वर्गीकरणासाठी ‘कॉम्पॅक्टर’चा पुरवठा; सोसायटी, वस्त्यांमध्ये ‘आयएफआरडी रीडर’युक्त डबे
कचरा व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न हाताळण्यासाठी महापालिकेने नव्याने देण्यात येणाऱ्या कंत्राटांमध्ये आमूलाग्र बदल करत नवी मुंबईच्या धर्तीवर शहरातील चार वॉर्डमध्ये कचरा वाहतुकीची एकात्मिक पद्धती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे करतानाच कचरा वाहतुकीच्या पद्धतीतही मोठे बदल केले आहेत. दहिसर ते कांदिवली तसेच मुलुंड या उपनगरांमध्ये कचरा उचलणे, गाडय़ांना जीपीएस यंत्रणा लावणे, कचऱ्याची वाहतूक ही सर्व जबाबदारी एकाच कंत्राटदाराकडे देण्यात येणार असून उर्वरित शहरासाठी ओला व सुका कचऱ्यासाठी कप्पे असलेला ‘कॉम्पॅक्टर’ वापरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘आयएफआरडी रीडर’ असलेले एक लाख कचरा डबे सोसायटी तसेच झोपडपट्टय़ांसाठी वितरित करण्यात येतील.
पाच वर्षांपूर्वी दिलेली कचरा उचलण्याची कंत्राटे आता संपत आली असल्याने नव्याने देण्यात येणाऱ्या कंत्राटांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबईच्या धर्तीवर शहरातील चार वॉर्डमध्ये कचरा वाहतुकीची एकात्मिक पद्धती आणली जाणार आहे. टी (मुलुंड), आर दक्षिण (कांदिवली) येथे स्वतंत्ररीत्या तर आर उत्तर (दहिसर) व आर मध्य (बोरिवली) यांचा कचरा एकत्रितपणे गोळा करण्यासाठी तीन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. या तीन परिसरांमध्ये एकूण ८०० ते ८५० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. आरएफआयडी रीडर असलेल्या कचऱ्याच्या डब्यातून कचरा उचलणे, त्यासाठी मजूर पुरवणे, ओला व सुका कचऱ्याची वेगळी वाहतूक करणे, त्यासाठी जीपीएस असलेल्या गाडय़ा वापरणे, सुका व ओला कचरा त्यांच्या संबंधित प्रकल्पांपर्यंत पोहोचवणे अशी सर्व कामे एकाच कंत्राटदाराकडून केली जाणार आहेत. यासाठी पालिकेने कोणताही दर निश्चित केलेला नाही.
उर्वरित शहरासाठी सध्या सहा टन क्षमतेच्या ६०० गाडय़ा तर २.५ टन क्षमतेच्या ३५० लहान गाडय़ा वापरल्या जातात. त्यातील ९४ गाडय़ा सुक्या कचऱ्याची वाहतूक करतात. नव्या कंत्राटानुसार सात वर्षांसाठी काम देण्यात येणार असून मोठय़ा गाडय़ांऐवजी सुका कचऱ्यासाठी दहा टक्के जागा असलेला कॉम्पॅक्टरची अट घालण्यात आली आहे. आतापर्यंत कोणत्याही शहरात अशा प्रकारे ९० टक्के जागा ओल्या कचऱ्यासाठी तसेच १० टक्के जागा सुक्या कचऱ्यासाठी देणाऱ्या गाडय़ा वापरल्या गेलेल्या नाहीत. मात्र बाजारात अशा प्रकारच्या गाडय़ा उपलब्ध आहेत. या गाडय़ांमुळे सर्व कचरा एकाच वेळी उचलला जाईल व सुका कचऱ्यासाठी वेगळ्या गाडय़ा पाठवण्याची गरज उरणार नाही, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विजय बालमवार म्हणाले.
बदल काय होणार?
* दहिसर ते कांदिवली तसेच मुलुंडमधील झोपडपट्टय़ांमधील कचरा उचलण्याची जबाबदारी स्वच्छ मुंबई प्रबोधन योजनेअंतर्गत नेमलेल्या गटांवरच असेल. मात्र, त्यांना कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे लागेल.
* कचरा उचलण्याचे एकात्मिक कंत्राट दिल्यावर ‘आर वॉर्ड’मधील सुमारे ४०० कामगार तर ‘टी वॉर्डर्’मधील सुमारे २०० कामगार इतरत्र पाठवले जाणार आहेत.
* शहरात १२० लिटरचे ५० हजार डबे तर २४० लिटरचे ५० हजार डबे वितरित केले जाणार असून त्यावर आरएफआयडी रीडर लावले जातील.
* अरुंद रस्ते असलेल्या भागांतील कचरा गोळा करण्यासाठी डाव्या बाजूने कचरा टाकता येईल, अशा तीन ते चार गाडय़ा प्रत्येक वॉर्डात देण्यात येतील.
* ए (कुलाबा, फोर्ट), डी (नेपियन्सी रोड, ताडदेव), के पूर्व (विलेपार्ले पू, अंधेरी पू.), के पश्चिम (विलेपार्ले प., अंधेरी प.) आणि एन (घाटकोपर) येथे सुका कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट दिले जाणार आहे.