दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग जलमय होऊ नये यासाठी नदी-नाल्यांची कंत्राटदारांमार्फत सफाई हाती घेतली जाते. त्यासाठी कंत्राटदारांना कोटय़वधी रुपये दिले जातात. पण तरीही मुसळधार पावसात मुंबईतील सखल भाग जलमय होऊन मुंबईकरांना त्रास सहन करावाच लागतो. असे का होते याचा विचार करायला हवा.

‘नेमेचि येतो पावसाळा..’ या कवितेप्रमाणे आता ‘नेमेचि येते मग नालेसफाई..’ अशी म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे. पूर्वी जूनचा पहिला आठवडा उजाडल्यावर मुंबईकरांना पावसाची चाहूल लागायची. पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडायचे. समुद्रकिनारे, घराजवळच्या उद्यानात जाऊन मुंबईकर पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटायचे. पण आता पालिकेत मार्चमध्ये नालेसफाईच्या कंत्राटांवरून राजकीय चिखलफेक सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना गेल्या वर्षी पावसाळ्यात सखल भाग तुंबून भोगाव्या लागलेल्या यातनांची आठवण होते आणि नको तो पावसाळा अशी म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

मुंबईमध्ये साधारण दोन मीटर रुंदीचे २५० किलोमीटर, तर दोन मीटरपेक्षा अधिक रुंदीचे तब्बल ४५० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. तब्बल ६०० किलोमीटर लांबीच्या पेटीका वाहिन्या आहेत, तर रस्त्यालगत तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीची गटारे आहेत. यामधून पावसाच्या पाण्याचा निचरा होतो. त्याशिवाय दहिसर, पोयसर, मिठी या नद्या. मुंबईमधील नाले आणि नद्यांचा काठ एकेकाळी मोकळा होता हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत गेली. केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यांतून मोठय़ा संख्येने बेरोजगार मुंबईत दाखल झाले. हळूहळू नदी-नाल्यांच्या काठावर झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आणि याच झोपडपट्टय़ा मुंबईत नोकरीनिमित्त आलेल्यांच्या आसरा बनल्या. काठावरची जागा कमी पडू लागली म्हणून नद्या आणि नाल्यांमध्ये भरणी करून त्यावर झोपडय़ा उभारण्यात आल्या. त्यामुळे नदी-नाल्यांची गटारे झाली. झोपडपट्टय़ांमधील सांडपाणी, मलजल त्यातच सोडले जाऊ लागले. त्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होऊ लागले. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या प्रलयंकारी पावसाने मुंबईची पुरती कोंडी केली. अतिक्रमणांनी नदी-नाल्यांचा मार्ग रोखल्यामुळे मुंबई जलमय झाली. मुंबईत एकच हाहाकार उडाला आणि अनेकांचे बळी गेले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारी यंत्रणांनी पुरामागील कारणांचा शोध घेतला आणि मुंबईमध्ये ब्रिमस्टोवॅड  प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पामध्ये नदी-नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत उभारणे, सफाई, सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उदंचन केंद्रे आणि पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारणे आदी कामे हाती घेण्यात आली. या सर्व कामांची जबाबदारी पालिकेवल सोपविण्यात आली. मात्र यापैकी एकही काम पालिकेला नियोजित वेळेत पूर्ण करता आलेले नाही. आजही काही ठिकाणी नदी-नल्यांच्या काठावर झोपडय़ा उभ्या आहेत. त्यामुळे नदी-नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे कामही खोळंबले आहे. आठ उदंचन केंद्रे उभारण्यात येणार होती. परंतु केवळ पाच-सहाच उदंचन केंद्रे पालिकेला कार्यान्वित करता आली. पालिकेने मुंबईत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारले. पण काही ठिकाणी त्रुटी राहून गेल्याने त्याचा फटका पावसाळ्यात मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. या सर्व कामांमध्ये अनेक अडथळे आले, पण हे अडथळे दूर करून कामांना गती देण्यात पालिका असमर्थ ठरली. म्हणूनच तब्बल १२ वर्षांचा काळ लोटला तरी पालिकेला ही कामे पूर्ण करता आलेली नाहीत.

पावसाळ्यापूर्वी ६० टक्के पावसाळ्यात २० टक्के आणि त्यानंतरच्या काळात २० टक्के अशा पद्धतीने कंत्राटदाराने नालेसफाई करणे अपेक्षित आहे. पण या पद्धतीने काम होतच नाही. पावसाळ्यापूर्वी सफाई झाल्यानंतर नाल्यांकडे कंत्राटदाराचे कामगार फिरकतच नाहीत. त्यामुळे पावसाळापूर्व काळ वगळता नालेसफाईबाबत प्रश्नचिन्हच आहे.

जानेवारी-फेब्रुवारी किंवा मार्च दरम्यान नालेसफाईच्या कंत्राटाचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादर केले जातात आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची परस्परांवर चिखलफेक सुरू होते. कामाचा कार्यादेश हाती पडल्यानंतर कंत्राटदार नदी-नाल्यांच्या काठावर निवांतपणे सफाईला सुरुवात करतात. पण नगरसेवक वा अधिकारी पाहणी करणार असे समजताच नाल्याचा परिसर यंत्रांच्या आवाजात दणाणून जातो. किती गाळ उपसला आणि तो कुठे टाकला याचा हिशेबच लागत नाही. केवळ प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवर मुंबईकरांनी विश्वास ठेवायचा. असे अनेक वर्षे चालत आले. पण दोन वर्षांपूर्वी नालेसफाई घोटाळा उघडकीस आणि कंत्राटदार-अधिकाऱ्यांचे संगनमत जगजाहीर झाले. नालेसफाईचा कामे पारदर्शक पद्धतीने व्हावी यावर भर दिला गेला. पण एकूणच या कामांबाबत मुंबईकर साशंक आहेत.

रेल्वे मार्गावर हवी तशी सफाई होत नसल्यामुळे नाल्यांतील पाण्याचा निचरा होत नाही, अशी ओरड पालिका अधिकारी कायम करतात. पण यंदा रेल्वेनेही आपल्या हद्दीत सफाई मोहीम हाती घेतली आहे. सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मुंबईत पाणी तुंबणार असा पवित्रा पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. पण पाणी तुंबून आपल्यावर खापर फुटू नये म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही आपली कामे सुरू असलेल्या ठिकाणी पाणी उपसा पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाईवर करडी नजर ठेवण्याची व्यवस्था केली. पण तरीही अनेक भागातील नाल्यांची सफाई झाली नसल्याची छायाचित्रे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी बैठकांमध्ये झळकविण्यास सुरुवात केली आहे. तर सत्ताधारी पक्षांच्या प्रमुखांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त करीत शिल्लक कामे झटपट पूर्ण करण्याची सूचना केली आहे. आरोप-प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू झाली आहे. नालेसफाईच्या कामाबाबतच्या विरोधाभासामुळे मुंबईकरांपुढे मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नासेलफाई कितपत झाली याचे उत्तर पावसाळ्यातच आपल्याला मिळेल.

prasadraokar@gmail.com