पंजाब नॅशनल बँकेत १३,००० कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचा अध्यक्ष मेहुल चोक्सी यांच्याविरोधात मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. यापूर्वी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा भारतीय पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे.


या प्रकरणातील नव्या माहितीनुसार, भारताने हाँगकाँगच्या पोलीस अधिकाऱ्यांना पीएनबी घोटाळ्यामधील आरोपी नीरव मोदीला अटक करण्याचे आवाहन केले आहे. नीरव मोदी हाँगकाँगमध्ये लपला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण त्याने अलाहाबाद बँकेच्या हाँगकाँग शाखेतून पैसे काढल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला चूना लावल्याप्रकरणी नीरव मोदीच्या विरोधात सीबीआयकडून पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर हप्त्याभरानंतर नीरवने बेल्जिअमच्या एंटवर्प शहरातील एका भारतीय सरकारी बँकेच्या शाखेतून मोठी रक्कम काढल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तो बेल्जिअममध्ये पळून गेल्याचे सांगण्यात येत होते.

केंद्रीय तपास पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बँकेतून मोठी रक्कम काढण्याचा हा प्रकार मोठा आश्चर्यकारक आहे. कारण ३१ जानेवारी २०१८ ला भारतीय बँकांच्या सर्व विदेशातील शाखांना या बाबतीत सावधान करण्यात आले होते. सीबीआय सातत्याने परदेशातील भारतीय बॅंकांच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. नीरव मोदीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.