ठाणे ते कल्याणदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्य रेल्वेचा दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र मेगाब्लॉकमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकलना प्रवाशांची तुफान गर्दी होती. कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांवर लोकलना थांबा नसल्याने प्रवासी जवळच्या स्थानकात जाऊन लोकल पकडण्याची धडपड करीत होते.  
कल्याण, डोंबिवली, ठाणे ही स्थानके सकाळपासून ते दुपापर्यंत गर्दीने ओसंडून वाहत होती. अनेक प्रवासी रेल्वे मार्गात उतरून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होते. महिला, लहान मुलांचे सर्वाधिक हाल झाले. विवाहाचा मुहूर्त असल्याने अनेक प्रवाशांनी सकाळी मेगाब्लॉक सुरू होण्यापूर्वीच लोकलने प्रवास करणे पसंत केले. उशिरा बाहेर पडलेल्यांना मेगाब्लॉकचा त्रास सहन करावा लागला. रेल्वे तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. खचाखच भरलेल्या लोकल पाहून अनेक प्रवाशांनी बस, खासगी वाहनांचा आसरा घेतल्याचे दिसत होते.