कल्याण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यासाठी स्वतंत्र फलाट

मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र सहा फलाट तयार करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या किमतीत तब्बल ५०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. याआधीच्या प्रकल्पात बदल करून नव्याने प्रकल्प मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे काही दिवसांपूर्वीच पाठवण्यात आला होता. नव्याने पाठवण्यात आलेल्या प्रकल्पात चार फलाटांऐवजी सहा फलाट आणि रेल्वे पूल सुचविण्यात आल्याने प्रकल्प किमतीत वाढ झाल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे बदल करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे कितपत फायदा मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मिळेल हे पाहण्यासारखे असेल.

कल्याण रेल्वे स्थानकात सध्या सात फलाट असून यातील दोन आणि तीन नंबर फलाट, चार आणि पाच तसेच सहा आणि सात नंबर फलाट सामायिक आहेत. चार आणि पाच नंबर फलाट, सहा आणि सात नंबर फलाटावरून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटतात. तर अन्य फलाटातून लोकल धावतात. एकंदरीतच स्थानकात होणारा गोंधळ आणि लोकल प्रवासात येणारा अडथळा पाहता याच स्थानकात पूर्व दिशेला असणाऱ्या मालवाहतूक गाडय़ांसाठी असलेल्या राखीव जागेवरच सहा फलाट बांधण्यात येतील. या फलाटांत लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतील.

२०१० साली तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात चार फलाट सुचवितानाच अन्य तांत्रिक कामे होती. मात्र प्रस्ताव मागे ठेवून सात वर्षांनी त्याला नवे रूप देण्यात आले आणि ८५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला गेला. २०१० साली प्रकल्प खर्च ३५० कोटी रुपये एवढा होता. हे पाहता ५०० कोटी रुपये वाढ प्रकल्पात झाली. चार ऐवजी सहा फलाट बांधतानाच कल्याण स्थानकाच्या दक्षिण पूर्व दिशेला मालवाहतूक गाडय़ांसाठी छोटा पूल बांधण्यात येणार आहे.

पनवेल आणि परेल येथे टर्मिनस

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडण्यात येतात. जवळपास २०० हून अधिक लांब पल्ल्याच्या गाडय़ा मुंबईतून धावतात. त्यामुळे दोन स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा भार वाढत असून पनवेल आणि परेल येथेही टर्मिनस बनविले जाणार आहेत. पनवेल टर्मिनसच्या कामाला सुरुवात झाली आहे. तर परेल टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे काही दिवसांपूर्वीच पाठवण्यात आला. याचबरोबर आता मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे स्थानकातही लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट बांधले जाणार आहे.